आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ-माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या शेतकरी विकास आघाडीने ११ जागांवर विजय मिळवत कारखान्याची सत्ता कशीबशी राखण्यात यश मिळवले, तर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील-डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील काळभरी आघाडीने ८ जागांवर विजय प्राप्त केला. िशदे यांनी हा निकाल धक्कादायक असल्याचे मान्य केले, तर सहकारमंत्री पाटील यांनी या कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाने मुश्रीफ यांच्या विजयी वारूला लगाम बसल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटना आमच्या बाजूने असती तर चित्र वेगळे दिसले असते असा विश्वास व्यक्त केला.
गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत तिरंगी लढत असल्याने निकालाची उत्सुकता होती. अतिशय संथगत्या मतमोजणी होऊन रात्री दीड वाजता निकाल जाहीर करण्यात आला. तेव्हा शेतकरी विकास आघाडीचे संग्रामसिंह नलवडे, बाळासाहेब मोरे, अमर चव्हाण, सतीश पाटील, श्रीपतराव िशदे, प्रकाश पताडे, दीपक जाधव, विद्याधर गुरबे, जयश्री पाटील, कृष्णा पाटील व सागर हिरेमठ हे विजयी झाले. तर काळभरी आघाडीचे डॉ. प्रकाश शहापूरकर, अनंत कुलकर्णी, प्रकाश चव्हाण, किरण पाटील, सुभाष शिंदे, क्रांतिदेवी कुराडे, संभाजी नाईक यांच्यासह संस्था गटातून सदानंद हत्तरगी यांनी विजय मिळवला. सात संचालक पुन्हा विजयी झाले तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष विनायक ऊर्फ अप्पी पाटील, बाबासाहेब पाटील, चंद्रकांत जांगनुरे, बाळासाहेब मोकाशी, श्रीपती कदम, भीमराव पाटील, निर्मला मगदूम या सात संचालकांना पराभवाला तोंड द्यावे लागले. क्रॉसवोटिंग झाल्यामुळे दिग्गजांना दणका बसल्याचे मतदानानंतर दिसून आले.
निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कारखान्याचा निकाल हा सहकार क्षेत्रातील बदलाची नांदी असल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, मुश्रीफांनी निवडणूक एकतर्फी जिंकण्याची वल्गना केली होती, पण निसटत्या विजयाने त्यांचे पाय आता जमिनीवर आले असतील. त्यांच्या चौफेर उधळलेल्या वारूला लगाम घातल्याबद्दल कारखान्याचे सभासद अभिनंदनास पात्र आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र लढण्याऐवजी नसíगक मित्राशी आघाडी केली असती तर निकाल वेगळा दिसला असता.
जनता दलाचे माजी प्रदेश अध्यक्ष श्रीपतराव शिंदे म्हणाले, मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर हे दोन आमदार व मी एकत्रित असतानाही काळभरी आघाडीला मिळालेले यश धक्कादायक आहे. ‘क्रॉस वोटिंग’चा मोठा फटका बसला आहे. सभासदांनी सत्ता आमच्याकडे सोपवली असली तरी कारखाना चालवणे हे आव्हानास्पद असून ते पेलण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू.