संगीत हे मिरज-सांगलीचा सांस्कृतिक वारसा असल्याने याचे महत्त्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीतमहोत्सवाचे उद्घाटन पं. आनंद भाटे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पहिल्या दिवशी पं. आनंद भाटे यांच्या गायनाने या संगीत सभेचा प्रारंभ झाला.
मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीतमहोत्सवाचे यंदाचे ६१वे वर्ष असून, या निमित्ताने अनेक मान्यवर कलाकार आपली संगीतसेवा रुजू करणार आहेत. या संगीत सभेच्या शुभारंभ प्रसंगी गायकवाड म्हणाले, की संगीत हे ईश्वराजवळ जाण्याचे साधन असून, अनेक कलाकार देवदत्त संगीताच्या देणगीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचे सामथ्र्य बाळगतात. भारतील संगीताला अभिजात कलेचा वारसा लाभला असून, या परंपरा जोपासण्याचे काम अशा संगीत सभांच्या माध्यमातून होते.
समाज एकत्र बांधण्याचे काम संगीतच करू शकते. सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी संगीताला पर्याय नाही, असे सांगून हा वारसा जोपासण्याचे काम मिरजेच्या संगीत पंढरीने केले आहे. ही ओळख जगापुढे मांडण्यासाठी जिल्हय़ाच्या संकेतस्थळावर याचा उल्लेख अविभाज्य ठरतो. प्रशासन हे काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष मधू पाटील मळणगांवकर यांनी स्वागत, तर उपाध्यक्ष डॉ. शेखर करमरकर यांनी केले. या वेळी जुन्या पिढीतील मंडळाचे कार्यकत्रे बापू गुरव, गजानन गुरव यांच्यासह मंडळाच्या आश्रयदात्यांचा सत्कार करण्यात आला.
संगीत सभेचे पहिले पुष्प गुंफताना पं. आनंद भाटे यांनी गायन पेश केले. त्यांनी प्रारंभी दुर्गा राग गायनासाठी निवडला. विलंबित आणि द्रुत लयीमध्ये सुरेल बंदिशी त्यांनी सादर केल्या. विलंबित एकतालात ‘तू तूस कान रे’ ही बंदिश त्यांनी सादर करीत रसिकांची वाहवा मिळवली. त्यानंतर त्यांनी ‘इंद्रायणी काठी’, ‘वद जाऊ कुणाला शरण’ यांसारखी गीते सादर केली. त्यांनी सादर केलेले ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ हे कन्नड गीत रसिकांची दाद मिळविणारे ठरले. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि पेटीवर सुयोग कुंडलकर यांनी साथ केली.
सूत्रसंचालन श्रीकांत पेंडूरकर, वैशाली जोगळेकर यांनी केले. आभार संभाजी भोसले यांनी मानले. या संगीत सभेचे संयोजन बाळासाहेब मिरजकर, विनायक गुरव, मजीद सतारमेकर, बजरंग गुरव, भास्कर गुरव ओंकार करमरकर, दीपक गुरव, प्रशांत गुरव आदींनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा