लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : आंबा घाट ( ता. शाहूवाडी ) येथे सड्यावरून दरीत उड्या मारून आत्महत्या केलेल्या दोघांचे मृतदेह रविवारी दुपारी काढण्यात आले. गूढ वाढवणाऱ्या या घटनेची नोंद साखरपा पोलीसात झाली आहे. स्वरूप दिनकर माने ( वय १९, रा, कवठे पिरान ) व सुशांत श्रीरंग सातवळेकर ( २१, निपाणी ) अशी त्यांची नावे आहेत. मठाधिपतीच्या निधनाने वैफल्यग्रस्त झाल्याने या दोन साधकांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली आहे.
गोरंबे ( ता. कागल ) येथे एक मठ आहे. तेथील मठाधिपती महाराजांचे १५ दिवसापूर्वी निधन झाले. या मठात स्वरूप व सुशांत गेल्या अडीच वर्षांपासून साधक म्हणून राहत होते. महाराजांचे निधन झाल्यापासून ते तणावात होते. ९ ऑगष्टला सुशांतने घरी फोन करून मी पावस येथील मठात जात आहे असे सांगितले. परंतु तेथे न जाता या दोघांनी आंबा घाटातील सड्यावरून सुमारे १०० फूट खोल असलेल्या दरीत उडी मारली.
आणखी वाचा-‘वारसा’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार, कोल्हापूरच्या मर्दानी खेळावर आधारित विषय
वनविभागाचे कर्मचारी जंगलात फिरती करीत असताना त्यांना मृतदेह व मोटार सायकल आढळून आली. जोराचा पाऊस, धुके असल्यामुळे शोध कार्यात शनिवारी सायंकाळी अडचण निर्माण झाली. रविवारी राजू काकडे हेल्थ ॲकेडमीचे राजू काकडे, भाई पाटील, प्रमोद माळी, विशाल तळेकर, अजय भोसले, संतोष मुडेकर, भगवान पाटील, दिनेशा कांबळे, दिग्विजय गुरव, पोलीस कॉन्स्टेबल सुयश पाटील आदींनी कष्टप्रद शोध मोहीम राबवून दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढले. या दोघांनी असे कृत्य का केले असावे याचे गूढ वाढीस लागले आहे.