कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन सुरू असताना दुसरीकडे रत्नागिरी – नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमी संपादनासाठी अल्प मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी भूमी संपादनाचे प्रयत्न हाणून पाडायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील लोकप्रतिनिधी आता सतर्क झाले आहेत. शिरोळ मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक घेऊन या प्रश्न तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  सध्या नागपूर ते रत्नागिरी महामार्गाच्या चालू असलेल्या कामासाठी अधिग्रहीत जमिनीचा मोबदला ४ पटीने मिळालेला असताना याच महामार्गाला सध्या शिरोळ व हातकणंगले मतदारसंघात सुरु होणाऱ्या कामाला फक्त २ पटीने भरपाई मिळणार असल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी, विहिरी या रस्त्याच्या कामात गेल्या असून शेतकऱ्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याकरिता संबंधित विभागाची बैठक आयोजित करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा >>>इचलकरंजी दूधगंगा पाणी प्रश्न: जोरदार निदर्शने; आमदार आवाडे यांच्यावर टीकास्त्र

आमदार पाटील म्हणाले की, सध्या नागपूर ते रत्नागिरी महामार्गाचे काम चालू आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील अंकली पासून ते कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक पर्यंतचे काम बंद आहे. परंतू अपूर्ण असलेल्या महामार्गाच्या या कामाचे दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी भारत राज्यपत्र प्रकाशित झालेले आहे. या रस्त्याच्या कामाकरीता शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील जमीन अधिग्रहणाचे काम चालू असून यासंबंधी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदविल्या आहेत. कारण सध्या चालू असलेल्या कामासाठी अधिग्रहीत जमिनीचा मोबदला याच महामार्गासाठी ४ पटीने मिळालेला असताना याच महामार्गाला सध्या शिरोळ व हातकणंगले मतदारसंघात सुरु होणाऱ्या कामाला २ पटीने भरपाई मिळणार आहे. तरी ही बाब संबंधीत शेतकऱ्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय करणारी आहे.तरी या बाबतीत आपण शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणेकरीता संबंधीत विभागाची बैठक आयोजित करावी, ही विनंती केली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला सूचना देवून तातडीने याप्रश्नी बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले. यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur ratnagiri highway land acquisition mla yadravkar request to chief minister eknath shinde to hold an urgent meeting amy
Show comments