अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे ‘नाम’ संस्थेकडून झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि. १७) दुपारी १ वाजता दुष्काळी खटाव तालुक्यातील जाखणगाव येथे येत आहेत. दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या या कलावंत सामाजिक कार्यकर्त्यांच्या दुष्काळ  दौऱ्याकडे लोकांमध्ये उत्सुकता आहे.
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी खटाव तालुक्यातीलच एनकूळ हे गाव दत्तक घेतले असून, येथे अभिनेते सयाजी शिंदे व मकरंद अनासपुरे यांनी भेट दिली होती. ग्रामीण जनतेला भावणारे सेलिब्रेटीज जलसंधारण व स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने दुष्काळी भागाचे दौरे करीत असल्याने दुष्काळग्रस्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तासाठी निधी उभारून सुरू केलेल्या कामामध्ये जाखणगावाने दुष्काळावर मात करून जलसंधारणाचा मोठा कार्यक्रम उभा केला आहे. पाटेकर व अनासपुरे यांची जाखणगाव भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या वेळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्यासह संबंधित अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. जाखणगावबरोबरच कोरेगाव तालुक्यातील नलवडेवाडी येथेही नामचे पदाधिकारी भेट देऊन कामाची पाहणी करणार आहेत.

Story img Loader