राज्यातील भोळय़ाभाबडय़ा जनतेची दिशाभूल करत भाजप सत्तेत आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ बोलघेवडे, थापाडे आहेत. ते महाराष्ट्राशी प्रामाणिक राहिले नाहीत. भाजपच्या रक्तामध्ये भ्रष्टाचार आहे. टोल हे त्याचे उदाहरण पाहायला मिळते, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे झालेल्या प्रचार सभेत टीकास्त्र सोडले.
राणे यांनी माउली चौकात झालेल्या सभेत तासाहून अधिक काळ भाजप व शिवसेना या सत्तारूढ पक्षावर सडकून टीका केली. ते म्हणाले, आजवर राज्यात अनेक मुख्यमंत्री खुर्चीवर बसले, पण त्यात सर्वात बेजबाबदार मुख्यमंत्री आत्ताचे आहेत. याला मोडून काढू, त्याला फोडून काढू अशी भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेला सहा हजार कोटीचे पॅकेज देणारे मुख्यमंत्री कोल्हापूरला एक दमडीही देत नाहीत. अशांकडून ‘अच्छे दिन’ कसे येणार, असा प्रश्न उपस्थित करून त्यागाची परंपरा असलेल्या काँग्रेसकडे सत्ता सोपविल्यास करवीरनगरीचा खऱ्या अर्थाने विकास होईल, असे नमूद करून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.
सेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या राणेंनी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, शिवसेना सत्तेसाठी लाचार झालेली आहे. बाळासाहेब ठाकरेंचा स्वाभिमान सत्ता-पैशासाठी उद्धव ठाकरेंनी गहाण टाकला आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणारी शिवसेना आता मूग गिळून गप्प बसली आहे. सत्तेत असलेले उद्धव ठाकरे भाजपवर टीका करीत असले तरी राज्याची अधोगती होण्यास भाजपबरोबर सेनाही जबाबदार आहे. राजकारणापेक्षा समाजकारण करतो, असे म्हणणाऱ्या शिवसेनेने वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकतरी लोकहिताचा प्रश्न आणला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. स्थानिक ताराराणी आघाडीवरही त्यांनी तोंडसुख घेतले. कालपर्यंत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावणारे आता कुठे गायब झाले आहेत, असा टोला आमदार महादेव महाडिक यांना लगावून शाहूंचे नाव घेणारे गुन्हेगारी पार्श्र्वभूमीचे उमेदवार नगरीचा विकास कसा करणार, असा प्रश्नही त्यांनी केली. सभेला माजी मंत्री पतंगराव कदम, सतेज पाटील, महापौर वैशाली डकरे, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील उपस्थित होते.

Story img Loader