अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर तसेच पानसरे हत्येदरम्यान डॉ. वीरेंद्र तावडेच्या येथील हालचाली कोल्हापूर पोलीस तपासणार आहेत. येथील सहा वर्षांच्या कालावधीत तो कोल्हापुरातील ‘सनातन’च्या साधकांच्या संपर्कात होता काय, याचा शोध पोलीस घेणार आहेत. वीरेंद्रने केलेल्या दूरध्वनींचा शोध पोलीस घेत असल्याचे शनिवारी दिसून आले.
दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या डॉ. वीरेंद्रसिंग तावडेची एसआयटीकडून चौकशी होणार आहे. वीरेंद्रही सनातनशी संबंधित असल्याने पानसरे हत्याप्रकरणात अटक केलेल्या समीर गायकवाड याच्याशी त्याचे काही ‘कनेक्शनचा’ शोध एसआयटी पथक घेणार आहे.
डॉ. वीरेंद्र तावडे २००२ ते २००८ या दरम्यान कोल्हापूर येथे वास्तव्यास होता. साईक्स एक्स्टेंशन येथे तो आपल्या पत्नीसह राहण्यास होता.
गंगावेश येथील क्षत्रीय अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर त्याचा दवाखाना होता.
या सहा वर्षांच्या काळात वीरेंद्र सनातनचा जिल्हा संघटक म्हणून कार्यरत होता. २००८ साली तो साईक्स एक्स्टेंशन येथील राहते घर विकून सातारा येथे राहण्यास गेला. सातारा येथे दीड वर्ष राहिल्यानंतर २०१० साली तो पनवेल येथे स्थायिक झाला.
पानसरे हत्येचे धागेदोरे शोधणार
वीरेंद्र तावडे कोल्हापुरात असताना तो कोल्हापूर येथे हदू जनजागृती समितीमध्ये कार्यरत होता. जिल्हा संघटक म्हणून त्याने काम पाहिले आहे. पानसरे हत्याप्रकरणातही वीरेंद्र तावडेचा हात आहे काय, याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाणार आहे.
श्रमिक मुक्ती दलाची शोधमोहीम
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोवदराव पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी श्रमिक मुक्ती दल आणि समविचारी संघटनांनी शनिवारी स्वतंत्र मोहीम सुरू केली आहे.
समीर – वीरेंद्रचे संबंध तपासणार
वीरेंद्र तावडे हा काही काळ मिरज सांगली येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेला समीर गायकवाड हा सांगली येथील असल्याने वीरेंद्र व समीर यांचे कनेक्शन पोलीस शोधणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा