कोल्हापूर : ओबीसींच्या आरक्षणात मुस्लिमांना वाटेकरी करण्याचे कर्नाटकातील प्रारूप काँग्रेसला संपूर्ण देशभर लागू करायचे आहे. हा पक्ष सत्तेवर आला तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागेल, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली.
गेल्या दहा वर्षांत भाजपने स्थिर सरकार देऊन देशाची अतुलनीय प्रगती केली आहे. राम मंदिराची उभारणी, काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हटवण्याचा निर्णय आणि विविध विकासकामांचे जाळे भाजपने निर्माण केले. जर काँग्रेस सरकार सत्तेवर आले तर हे सर्व बदलून ते सध्याच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावत मुस्लिमांना आरक्षण देईल, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची येथील तपोवन मैदानावर सभा झाली. या वेळी मोदी यांनी आपल्या कार्यकाळात देशाचा विकासाचा आलेख मांडताना काँग्रेस, इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यासाठी त्यांनी शेजारच्या कर्नाटक राज्यातील काँग्रेसचा संदर्भ दिला.
हेही वाचा >>>पाच वर्षात पाच पंतप्रधान देण्याची काँग्रेसची नीती देशातील जनता सहन करणार नाही – नरेंद्र मोदी
पाच वर्षांत देशाला पाच पंतप्रधान देण्याचे स्वप्न हा पक्ष पाहत आहे. हा प्रकार देशातील जनता सहन करणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी येथील प्रचारसभेत काँग्रेसच्या रणनीतीवर टीका केली. महाराष्ट्रात नकली शिवसेना काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करीत असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.
मोदी म्हणाले, ‘‘कर्नाटकमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी २७ टक्के आरक्षण होते. रातोरात त्यामध्ये बदल करून मुस्लिमांना आरक्षण देण्यात आले आणि त्यांनीच ते बळकावले. उद्या देशात काँग्रेस सत्तेवर आले, तर देशातील आरक्षणाला धोका निर्माण होणार आहे. कर्नाटकात काँग्रेसने अडीच वर्षांसाठी एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडला आहे. पुढच्या अडीच वर्षांमध्ये त्यामध्ये बदल केला जाणार आहे. झारखंड, राजस्थान राज्यांमध्ये हाच प्रकार वापरला गेला. सत्याची मोडतोड करणाऱ्या काँग्रेसकडे कोणीही सत्ता सोपवणार नाही.’’
विरोधकांकडे हिंमत आहे का?
काश्मीरमधील अनुच्छे ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतला. इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर हा निर्णय फिरवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मोदींनी उचललेले पाऊल मागे फिरवण्याची हिंमत विरोधी आघाडीत आहे का, असा प्रश्न पंतप्रधानांनी विरोधकांना विचारला.
सामान्यांच्या संपत्तीवर डोळा! मतांसाठी दलितांचे आरक्षण आणि सर्वसामान्यांची संपत्ती हिरावून घेण्याचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यांना रोखले पाहिजे. सामान्यांच्या कष्टाची कमाई लुटणाऱ्या या प्रवृत्तीला या निवडणुकीत रोखा, असे आवाहन मोदींनी केले.
काँग्रेसची राम मंदिराकडे पाठ
अयोध्येमध्ये ५०० वर्षांनंतर राम मंदिर बांधण्याचे देशवासीयांचे स्वप्न साकारले. राम मंदिराविरोधात न्यायालयीन दावा करणारा अन्सारी परिवार प्राणप्रतिष्ठा सोहळय़ाला उपस्थित राहिला. काँग्रेसने मात्र त्याकडे पाठ फिरवली. हाच काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया अशा शब्दांनी हिणवणाऱ्या डीएमके पक्षाबरोबर आहे, अशी टीका मोदी यांनी केली.