लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : दोनवेळा फिल्मफेअर पुरस्कारावर मुद्रा उमटवलेले येथील सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी दिग्दर्शित केलेल्या मर्दानी खेळावर आधारित वारसा या माहितीपटाला २०२२ सालाचा राष्ट्रीय पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला. कला, सांस्कृतिक विभागातील हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे. भारतातील चित्रपट क्षेत्रामध्ये हा पुरस्कार महत्त्वपूर्ण समजला जातो.

या माहितीपटाचे संशोधन व चित्रीकरण सलग दोन वर्षे कोल्हापुरात झाले. कुस्ती, फुटबॉलवेड्या कोल्हापुरात मर्दानी खेळाचे आखाडे अजूनही तग धरून आहेत. मर्दानी खेळाडू व त्यांना घडविणारी वस्ताद मंडळी स्वतःच्या खिशाला झळ लावून हा खेळ जपत आहेत ते केवळ खेळाच्या प्रेमापोटीच.

आणखी वाचा-बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात इचलकरंजी बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

मर्दानी खेळ म्हणजे शिवकालीन युद्धकला. या युद्धकलेच्या जोरावर शिवाजी महाराजांनी साम्राज्याचा विस्तार केला. त्यांचे मावळे मर्दानी खेळात पारंगत होते. हा युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी कोल्हापुरातील स्थानिक कसा प्रयत्न करत आहेत हे या माहितीपटात दाखवण्यात आले आहे. वस्तादांच्या व खेळाडूंच्या मुलाखती, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असे या २५ मिनिटांच्या माहितीपटाचे स्वरूप आहे.

हा पुरस्कार मी शिवरायांच्या मावळ्यांना तसेच ही युद्धकला जपलेल्या सर्व खेळाडू व तालमींना अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून माहितीपटाचे लेखक, निर्माता, दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी शासनाने मर्दानी खेळाला शालेय क्रीडाप्रकारात स्थान द्यावे, तरच शिवरायांचा हा समृद्ध वारसा जपला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आणखी वाचा-सायबर फसवणुकीच्या घटना वाढत असताना हा विभाग, राज्य शासन करते काय? मंत्री हसन मुश्रीफ यांचा घरचा आहेर…

पडद्यावर भव्य स्वरूपात दिसणारा माहितीपट तयार करण्यासाठी ३० लाख इतका खर्च झाला आहे. तो बनवताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. बॉलिवूडमध्ये सर्वोच्च मानला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना यापूर्वी २०१९ मध्ये सॉकर सिटी आणि २०२२ मध्ये वारसा या दोन माहितीपटासाठी मिळाला होता. आताचा पुरस्कार कोल्हापूरच्या कला व क्रीडाविश्वासाठी ही मोठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट ठरली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National award for documentary varsa mrj