महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीस विरोध करत शिरोली व नागांवच्या ग्रामस्थांनी सोमवारी सांगली फाटा येथे पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखला. यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली. सर्व पक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीतर्फे आंदोलन केले. आंदोलकांनी शिरोली गाव हद्दवाढीतून वगळण्याचा निर्णय होईपर्यंत विविध मार्गाने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
हद्दवाढीस विरोध करत आंदोलकानी सुमारे चाळीस मिनिटे महामार्ग रोखून धरला. कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात काळे झेंडे घेऊन निदर्शने केली.   शिरोली आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, हद्दवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महामार्ग रोखल्याने दोन्ही बाजूला सुमारे पाच किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या.
आमदार सुजित मिणचेकर म्हणाले,की चार दिवसापासून कडकडीत बंद पाळून शिरोलीकरांनी आपला विरोध दर्शवला आहे. आता लोकप्रतिनिधी म्हणून हद्दवाढ रोखणे ही आमची जबाबदारी आहे. शिरोलीकरानी आमच्यावर विश्वास ठेवून बंद मागे घ्यावा. शासन दरबारी पाठपुरावा करून मी, आमदार महाडिक आणि आमदार नरके तिघे मिळून हा हद्दवाढीचा डाव हाणून पाडू. महापालिकेच्या स्वार्थी हद्दवाढ प्रस्तावाची माहिती मुख्यमंत्र्यांना देऊन, हद्दवाढ रद्द करावी अशी विनंती करणार आसल्याचे आमदार मिणचेकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे  शशिकांत खवरे म्हणाले, शिरोली व नागांव मधील रिकाम्या भूखंडावर डोळा ठेवून हद्दवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. यामुळे हद्दवाढीस आमचा ठाम विरोध आहे, शिवसेना तालुका प्रमुख बाजीराव पाटील म्हणाले, हद्दवाढ रोखली नाही तर शिरोलीतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग बेमुदत रोखला जाईल.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे सुभाष पाटील म्हणाले,की हद्दवाढीमुळे गावचे अर्थकारण आणि समाजकारण कोलमडणार आहे. यामुळे  हद्दवाढ विरोधी आंदोलनास जनसुराज्य शक्ती पक्षाचा पािठबा राहील. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे, गोिवद घाटगे, सतीश पाटील, सुरेश पाटील यांची  भाषणे झाली.
बंद मागे
आमदार डॉ मिणचेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, हद्दवाढ विरोधी कृती समितीने बेमुदत बंद मागे घेतला. यामुळे गावातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने सुरळीत सुरू झाली. कृती समितीने साखळी उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा