कोल्हापूर : आंबेमोहोळ मध्यम प्रकल्पाच्या २२७ कोटीच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर त्यावरून राजकीयक्षेत्रात वादाचे फटाके फुटू लागले आहेत. हा प्रकल्प कागल विधानसभा मतदारसंघात येत असल्याने राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि त्यांना विधानसभेसाठी आव्हान देणारे भाजपचे संभाव्य उमेदवार, म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यात श्रेयवादाचे पाट वाहू लागले आहेत.आपल्याच प्रयत्नाने प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याचा ढोल वाजवत परस्परांना लक्ष्य केले जात असल्याचे बुधवारी दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंबेमोहोळ प्रस्तावास मंजुरी मिळण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे, अशा आशयाचा मजकूर घाटगे यांनी फेसबुकवर प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या पोस्टला प्रतिसाद मिळत असून रखडलेला प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल अभिनंदन केले जात असून कार्यतत्पर भावी आमदार असे कौतुक केले जात आहे. ही बाब या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारे मुश्रीफ यांना बोचली असून त्यांनी एका पत्रकाद्वारे घाटगे यांच्या श्रेय लाटण्यावर टीका करत ही मंजुरी आपल्या प्रयत्नाचे फलित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

उत्तुरकरांची दिवाळी – समरजितसिंह

उत्तुर परिसरासाठी वरदान ठरणारा आंबेओहळ प्रकल्प बरीच वर्षे प्रलंबित होता. भाजपा सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस कागलमध्ये आले होते. त्यावेळी या प्रश्नात लक्ष घालून हा प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती आपण मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. याचा पालकमंत्री पाटील यांच्यामार्फत सतत पाठपुरावा केला. घाटगे यांच्या प्रयत्नाला यश आले असून आत्ता हा प्रकल्प मार्गी लागण्यास काहीही अडचण नाही. याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे आभार  मानले. याबद्धल उत्तुर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून उत्तुरकरांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली आहे, असे घाटगे यांनी समाज माध्यमातील मजकुरात म्हटले आहे.

घाटगेंची केविलवाणी धडपड – मुश्रीफ

आंबेमोहोळ प्रकल्पाचे बहुतांशी म्हणजेच ९० टक्के काम काँग्रेस व राष्ट्रवादी या आघाडी शासनाच्या कार्यकाळातच पूर्ण झालेले आहे. त्यानंतर आलेल्या युती शासनाच्या नाकर्तेपणामुळेच हा प्रकल्प रखडला आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्यांदा सुधारित मान्यता मिळाली आहे. या पाश्र्वभूमीवर प्रसारमाध्यमांना माहिती  देण्याएवढे समरजित घाटगे यांनी नवीन काय केले,  असा सवाल आमदार मुश्रीफ  यांनी केला आहे. शासनाच्या विविध निर्णयांची आणि धोरणांची गडबडीने माहिती घेऊ न केवळ राजकीय श्रेय मिळवण्यासाठीच त्यांची ही केविलवाणी धडपड आहे,असा आरोपही त्यानी केला आहे. चिकोत्रा प्रकल्प माझ्या काळामध्ये पूर्ण झाला आहे. नागनवाडी प्रकल्पाचे ७० टक्के आणि आंबेमोहोळ प्रकल्पाचे ९० टक्के काम मीच पूर्ण केले आहे. उर्वरित दहा ते पंधरा टक्के कामासाठी शासनाने प्रचंड उदासीनता दाखवल्यामुळे हा प्रकल्प रखडल्याकडेही  मुश्रीफ यांनी लक्ष वेधले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla hasan mushrif pune mhada president samarjitsinh ghatge