कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांच्यावर टीकेची तोफ डागली. पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेविषयी साशंकता दर्शवताना खासदार संभाजीराजे यांच्याशी दिलजमाई करण्याचा इरादा व्यक्त केला. महाडिक यांना गेल्या काही दिवसांत लक्ष्य करणाऱ्या नेत्यांविषयी आज त्यांनी वेगवेगळय़ा प्रकारे उत्तर दिले.

विमानतळ धावपट्टी रुंदीकरणाच्या कामाच्या शुभारंभात महाडिक कुटुंबीयांनी हा कार्यक्रम परस्पर उरकल्याने खासदार संभाजीराजे यांनी खासदार महाडिक यांच्यावर टीका केली होती. या बाबत महाडिक यांनी संभाजीराजेंची प्रत्यक्ष भेट घेऊन गैरसमज दूर करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या कामी ५८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमी संपादनासाठी प्रयत्न केले आहेत. अमल महाडिक यांनीही विद्युतीकरणाच्या कामाला गती दिली आहे.

आमदार हसन मुश्रीफ यांच्याविषयी माझ्या मनात आदराची भावना आहे. त्यांनी इतरांची (मंडलिक) उमेदवारी जाहीर केली. याबद्दल त्यांच्या मनात काय नेमके काय चालले आहे हे कळत नाही, असे महाडिक म्हणाले. सतेज पाटील यांच्याबाबत ते म्हणाले, पैशाच्या जिवावर कोणालाही पराभूत करू, अशी त्यांची प्रवृत्ती आहे. मागील लोकसभा निवडणुकीवेळी मी त्यांच्या भेटीला गेलो होतो, पण आता मात्र जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार उभय काँग्रेसची आघाडी करत असताना हे बिघाडी करायला निघाले आहेत, असे म्हणत त्यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला. ‘महाडिक यांना हद्दपार करू’ असे विधान करणारे संजय मंडलिक शुद्धीवर असतात का, असा बोचरा प्रश्न त्यांनी केला. पंचवीस वर्षे घरात सत्ता असताना पुन्हा सत्तेची हाव त्यांनी धरू नये. लोकांचे प्रेम असल्यामुळे महाडिक यांच्या घरात खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशी मानाची पदे आली आहेत याची जाणीव त्यांनी करून दिली.

शरद पवार अडथळा दूर करणार

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी आपल्याला मिळेल  या बाबत काही अडचणी आल्या तर पक्षनेते शरद पवार त्या दूर करतील. काही अडचणी आल्या तरी पवार हा विषय व्यवस्थितपणे हाताळतील. त्यातूनही अडचणी आल्या तर ते सुचवतील त्या त्याप्रमाणे कार्यरत राहणार आहे, असे म्हणत महाडिक यांनी आपल्या निष्ठा पवारांना वाहिल्या.