महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागाचा विषय थोडा बाजूला ठेवला आहे. सध्या लोकसभेच्या ४८ जागांचा विषय होता. त्यातील ४० जागांचा विषय संपला असून ८ जागांचा तिढा कायम आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते आज (रविवार) कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, प्रत्यक्षात तीन ठिकाणी अडचणी येत आहेत. पण त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीपैकी कोणाचा उमेदवार सक्षम आहे, हे तपासले जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रभावी उमेदवार दिले जाणार आहेत. येत्या ८ दिवसांत हा प्रश्न सुटेल. त्यानंतर राज्यात प्रमुख शहरांत उभय काँग्रेसच्या संयुक्त प्रचार सभांना सुरूवात करणार आहे.

यावेळी पवार यांनी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयीही भाष्य केले. ते म्हणाले, डी वाय पाटील हे मला राष्ट्रवादीचे सभासद करण्याविषयी आग्रह धरत होते. ते माझे हितचिंतक आहेत. गरज पडल्यास ते मार्गदर्शन सुद्धा करतील. सक्रिय नसले तरी या गुणांमुळे ते आम्हाला महत्वाचे आहेत, असा खुलासा त्यांनी केला.

मुश्रीफ-महाडिक वादावर पडदा
आमदार हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. त्यांचा उपयोग महाष्ट्राच्या विधी मंडळात जास्त होईल. पण त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची भूमिका समजून घेतली जाईल, असे सांगत पवारांनी मुश्रीफ हे विधानसभेत आणि खासदार धनंजय महाडिक लोकसभेत दिसतील असे संकेत देत वादावर पडला टाकला.

Story img Loader