राष्ट्रवादीच्या राजकीय मंचावरून भाजपच्या मंत्र्यांवर शरसंधान केले जात असताना कोल्हापूर जिल्हय़ातील पक्षाचे खासदार व आमदार केलेल्या कामाची उतराई म्हणून भाजपच्या मंत्र्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. रस्ते विकास कामासाठी भरघोस निधी मिळाल्याचे कारण पुढे करीत खासदार धनंजय महाडिक व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन करणाऱ्या भल्यामोठय़ा जाहिराती स्थानिक वृत्तपत्रात देऊन जाहीररीत्या धन्यवाद दिले आहेत. त्यांच्या या भूमिकेची पक्षासह विरोधकांतही चर्चा आहे.
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर नव्या शासनाला पाठिंबा देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. नंतर सत्तेमध्ये शिवसेना सहभागी झाल्याने राष्ट्रवादीने सत्तेत येण्याचा मुद्दा मागे पडला. तथापि, भाजप व राष्ट्रवादीमध्ये अंतर्गतरीत्या मधुर संबंध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत राहिली. कोल्हापूर जिल्हय़ात मात्र भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष असल्याचे अनेकदा दिसून आले. विशेषत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यात कोल्हापूर महापालिका, जिल्हा मध्यवर्ती बँक ते गेल्या आठवडय़ातील गडिहग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीपर्यंत वाद ताणला गेला. दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांतही संघर्ष होत राहिला.
हे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी भाजपच्या मंत्र्यांचे जाहीरपणे कौतुक करताना दिसू लागले आहेत. निमित्त ठरले आहे रस्ते कामासाठी केलेल्या भरघोस निधीच्या मदतीचे. जिल्हय़ाला विविध प्रकारच्या रस्ते कामांसाठी सुमारे २५० कोटींचा निधी उपलब्ध होत असून सर्वच खासदार व आमदार यांच्या मतदारसंघात भरघोस निधी मिळाला आहे. मोठय़ा प्रमाणात रस्ते कामे होऊन मतदारसंघातील दळणवळणाचे काम मार्गी लागणार असल्याने लोकप्रतिनिधींना आनंद होणे स्वाभाविक आहे. याच भावनेतून खासदार महाडिक व आमदार कुपेकर या राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरातबाजी केली असून, आपल्यासह मंत्री पाटील यांचे ठळक छायाचित्र वापरून जाहीररीत्या आभार व्यक्त केले आहेत.
भाजप सरकारच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असताना पक्षाचे लोकप्रतिनिधी मात्र विरोधी गोटातल्या मंत्र्यांचे अभिनंदन करीत असल्याने कार्यकत्रे अस्वस्थ आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आश्चर्य व्यक्त करीत भाजप मंत्र्यांचे छायाचित्र नकळत वापरले गेले असावे, अशी शंका व्यक्त केली. लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कामाची जाहिरातबाजी करताना किमान पक्षनेते शरद पवार यांचे छायाचित्र असणे जरुरीचे आहे. छायाचित्राच्या मुद्यावरून महाडिक विदेश दौऱ्यावरून परतल्यावर, तर कुपेकर यांच्याशी रविवारी चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.