लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : आपत्ती सांगून येत नसते. अशा वेळी शासकीय यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे असते. आपत्ती निराकरणासाठी कामाला वाहून घेण्याची वृत्ती असली पाहिजे. माझ्याकडे ज्यावेळी अशाप्रकारची जबाबदारी आली तेव्हा हे काम पूर्ण क्षमतेने करता आले याचे समाधान आहे, असे मत माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

आपत्ती निवारण क्षेत्रात कार्य करणाऱ्या येथील व्हाईट आर्मी या संस्थेच्या वतीने शरद पवार यांनी आपत्ती क्षेत्रात केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून महायोद्धा हा पुरस्कार खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत किल्लारी भूकंप, गुजरात मधील भूकंप या महत्त्वाच्या आपत्ती प्रसंगी केलेल्या कार्याची आठवण करून दिली.

ते म्हणाले, की किल्लारीत भूकंप झाल्यानंतर दिल्लीहून महाराष्ट्रात येवून तेथील जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न करतानाच योग्य पद्धतीचे पुनर्वसन केले. गुजरातमध्ये भूकंप झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्व पक्षांची बैठक बोलावली होती. तेव्हा आपत्ती निवारणाची जबाबदारी सोपवल्यानंतर तेथेही अल्पकाळात चांगले काम करता आले याचे समाधान आहे. आपत्तीच्या प्रसंगी काम करणाऱ्या व्हाईट आर्मी सारख्या संस्था आणि स्वयंसेवकांना संकट दूर करण्याच्या कामी आपण सर्वांनी सहकार्य करूया, असे आवाहन त्यांनी केले.

अशोक रोकडे यांनी प्रास्ताविकात व्हाईट आर्मीच्या कार्याचा आढावा घेतला. उमेशचंद्र सारंगी, दत्तात्रय मेतके, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे आर. डी. पाटील, पाटीदार समाज यांना शरद पवार यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन युद्ध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, समरजित घाटगे, व्ही. बी. पाटील, कुलगुरू डॉ. डी. एन. शिर्के, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. व्ही. एन. शिंदे उपस्थित होते.