गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर बाजाराशेजारी एका घराच्या दारात स्त्री जातीचे नवजात अर्भक गुरुवारी आढळले. अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाची प्रकृती चिंताजनक बनली. शेख कुटुंबाच्या दारात प्लास्टिकच्या कॅरीबॅकमध्ये कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत अर्भक आढळले. शेख कुटुंबीयांनी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या मदतीने अर्भकास सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी शोध घेण्याचे काम सुरू केले. सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शेख यांच्या दारात पिशवी नसल्याचे लोकांनी सांगितले. यामुळे ५ ते ६ या वेळेतच हे अर्भकच ठेवल्याचा अंदाज आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गबाले करत आहेत. अर्भकाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती.
जमिनीच्या वादातून कुटुंबाला मारहाण
करंजफेण (ता. शाहूवाडी) गावात जमिनीच्या वादातून कुटूंबाला मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. यामध्ये पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाळासाहेब सत्तू गुरव (वय ४१), विठ्ठल धोंडी गुरव (वय ६०), नंदीनी बाळासो गुरव (वय ३५), सारिका बाळासो गुरव (वय २२), अनुसया विठ्ठल गुरव (वय ५५) अशी जखमींची नावे आहेत. गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब गुरव शेतामध्ये निघाले असताना त्यांना बाजीराव विभवाजी गुरव यांनी अडवले. त्यांच्यात गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून वाद सुरु असून यातूनच गुरुवारी दोघांत वाद झाला. या रागातून चिडून बाजीराव गुरव, केशव गुरव, विलास गुरव, रामचंद्र गुरव, विकास गुरव यांनी मारहाण केल्याचे बाळासाहेब गुरव यांनी पोलिसांना सांगितले.