गुन्हय़ाचा छडा लावण्यात यश
पदरी एकूण सहा अपत्ये. पकी ४ मुली आणि १ मुलगा त्यात आणखी एक मुलगा व्हावा ही अपेक्षा. पण पुन्हा मुलगी जन्मली आणि मातापित्याचा हिरमोड झाला. निर्दयी आईवडिलांनी अवघ्या काही तासांत पोटच्या गोळय़ाला उघडय़ावर टाकले, पण त्यांचे हे दुष्कृत्य पोलिसांनी उघडय़ावर आणले. शनिवारी या प्रकरणी निर्दयी आई-वडील हसीना रशीद सय्यद (वय ३६), रशीद जब्बार सय्यद (वय ४०, रा. सदर बाझार) यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. ४८ तासांत शिताफीने तपास करून लक्ष्मीपुरी पोलिसांनी याचा छडा लावला.
सदर बझार येथील रशीद सय्यद यांचा ऋणमुक्तेश्वर पसिरात राहणाऱ्या हसीना शेख यांच्याशी १९९५ साली विवाह झाला. त्यानंतर त्यांना तीन मुली झाल्या. मग एक मुलगा झाला आणि यानंतर पुन्हा दोन मुली. झाल्या. पहिली मुलगी १९ वर्षांची असून २ मे रोजी तिचा विवाह झाला असून, बाकीचे शिकत आहेत. हसीना या गर्भवती राहिल्या. त्यांनी उपचारासाठी कोणत्याही दवाखान्यात आपले नांव नोंदवले नाही. बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घरीच त्यांची प्रसूती झाली. प्रसूती झाल्यानंतर मुलगी झाल्याचे हसीना व रशीद यांना कळले.
यानंतर या दोघांनी ही बाब कुणालाही न सांगता त्या अर्भकास बाहेर सोडून येण्याचा निर्णय घेतला. घरीच त्या अर्भकाची नाळ कापून तिला एका कापडात गुंडाळले व तिला कॅरी बॅगमध्ये ठेवले.
त्या नकोशीला कुठेतरी ठेवून ही गोष्ट या ठिकाणीच संपवायची म्हणून हसीना घरातून थेट मध्यवर्ती बस स्टँडपर्यंत चालत आली. या ठिकाणी रिक्षा पकडून ती गंगावेश येथे उतरली. ऋणमुक्तेश्वर येथील आपल्या माहेरी या बाळाचा कोणीतरी सांभाळ करेल असे हसीना यांना वाटले म्हणून तिने ते अर्भक पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेतच आपल्या आईच्या दारात ठेवले व निघून गेल्या. सकाळी जमेला शेख यांनी ही गोष्ट पाहिली. यानंतर पोलिसांनी तपासला सुरुवात केली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी यासाठी दोन दिवसांत १६५ गर्भवती महिलांची माहिती गोळा करून त्यांच्याकडे विचारपूस केली. मात्र हसीना यांनी कोणत्याच दवाखान्यात नाव नोंदवले नव्हते, यामुळे माहिती मिळत नव्हती.
मात्र अत्यंत बारकाईने तपास करून पोलिसांनी सय्यद कुटुंबीयांचा शोध घेतला. त्या अर्भकाची तब्येत खालावली असून तिला सीपीआर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. बाळास मोठय़ा प्रमाणात जंतुसंसर्ग झाला असून श्वास घेण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा