कोल्हापूर : कलानगरी कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओच्या अस्तित्वाचे कथानक नवनवे वळण घेत चालले आहे. जयप्रभा स्टुडिओची नेमके काय होणार याचा नेमका अंदाज येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्टुडिओच्या उर्वरित जागा, इमारतीची खरेदी वादात सापडली असताना खरेदीदारांकडून पर्यायी जागा द्यावी अशी मागणी केली आहे. कोल्हापूर महापालिकेने त्यास नकार दिला आहे. स्टुडिओबाबतच्या वाटा-वळणांचा हा अडथळय़ाचा प्रवास पाहता अंतिम निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागणार असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी चित्रपटांचे माहेरघर, चित्रपट निर्मितीतील प्रयोगशीलता याचा ऐतिहासिक वारसा कोल्हापूरला लाभला आहे. जयप्रभा स्टुडिओ त्यातील एक सुवर्णपान. ऐतिहासिक किनार असतानाही या स्टुडिओला वादाचे उपकथानक जोडले गेले आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी स्थापन केलेला हा स्टुडिओ काही अटीझ्र् शर्तीसह चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांना विकण्यात आला. भालजींनी तो लता मंगेशकर यांना विकला. मंगेशकर यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी त्यातील काही जागेची विक्री केली. तेव्हा या जागेवर कलाकार, तंत्रज्ञान यांना घरकुल बांधण्याचा प्रस्ताव शासन यंत्रणेकडे सादर केला होता. पण विकसकांनी व्यावसायिक तत्त्वावर ही घरकुले कलाकारांनी ऐवज इतरांना विकली. त्या विरोधात वादाचे मोहोळ उठले होते. या विक्री व्यवहारास अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, चित्रकर्मी, लोकप्रतिनिधी यांनी विरोध, आंदोलन केले. त्यानंतर हे प्रकरण या ना त्या कारणाने सतत चर्चेत, वादात राहिले.

लता मंगेशकर यांनी उर्वरित जागाही विकण्याचा प्रयत्न केला. याहीवेळी त्यास विरोध करण्यात आला. विक्री व्यवहार होवू नये यासाठी कोल्हापूर महापालिकेने या जागेला वारसास्थळाचा (हेरिटेज) दर्जा दिला. ही पार्श्वभूमी असताना कोल्हापुरातील महालक्ष्मी एलएलपी या भागिदारी संस्थेने दोन वर्षांपूर्वी स्टुडिओची खरेदी केली. हे प्रकरण लता मंगेशकर यांच्या निधनानंतर उघडकीस आले. खरेदीदारांना मध्ये शिवसेनेचे माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या दोन मुलांचा समावेश असल्याने वाद निर्माण झाला. क्षीरसागर यांनी यापूर्वी जयप्रभा स्टुडिओतील साहित्य हलवण्याच्या वेळी तसेच इतर आंदोलनातही सहभाग घेतला होता. मात्र महालक्ष्मी एलएलपीच्या खरेदी व्यवहारात त्यांच्या मुलांचा सहभाग होता. असा काही व्यवहार मुलांनी केला आहे हे आपणास ज्ञात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पर्याय आणि नकार

आता वाद निर्माण झाल्यावर महालक्ष्मी फर्मच्या वतीने कोणीही म्हणणे मांडण्यास पुढे येत नाही. क्षीरसागर यांनीच जयप्रभा स्टुडिओ जतन केले जावे या चित्रपट महामंडळ, चित्रपट कलाकारांच्या मागणीला आपले पाठबळ असल्याचे नमूद करतानाच महालक्ष्मी फर्मला पर्यायी जागा दिली जावी, अशी मागणी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. याबाबत महापालिकेने प्रस्ताव देण्याचे निर्देश  शिंदे यांनी दिले. जयप्रभा स्टुडिओच्या जागेला महापालिकेला पर्यायी जागा देणे शक्य नसल्याचे पालिकेच्या नगररचना विभागाने चर्चेवेळी स्पष्ट केले आहे. ही जागा खरेदी करण्याचा पर्यायही कायदेशीर नसल्याचे सांगण्यात आले. नगर विकास विभागाला कायदेशीर बाबी तपासून अहवाल पाठवला जाणार असल्याचे महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासन डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्पष्ट केले आहे.

अडसर काय?

जयप्रभा स्टुडिओ जतन, विकसित करण्याचा मनोदय पालकमंत्री सतेज पाटील, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही व्यक्त केला आहे. यामुळे आता मंत्री, लोकप्रतिनिधी, चित्रकर्मी अशा सर्वानाच राज्य शासनाकडे पाठपुरावा करणे भाग आहे. मात्र तो करताना अंतर्गत शह-काटशहाचे राजकारण झाले तर हा प्रश्न आणखीनच जटील होवू शकतो. दुसरीकडे जयप्रभा स्टुडिओ बाबत सत्र न्यायालयात एक दावा प्रलंबित आहे. तो अव्हेरून काही एक निर्णय घेणेही राज्य शासनाला सोपे नाही. जयप्रभा स्टुडिओ

खरेदीच्या वादाचे कथानक कळसाध्याय  पोहोचताना गुंता आणखीनच वाढत असल्याचे  दिसत आहे.

चेंडू राज्यशासनाकडे

महापालिकेची ही भूमिका पाहता जयप्रभा स्टुडिओचे जतन कसे केले जाणार, या जागेत नव्याने चित्रनगरीच्या धर्तीवर स्टुडिओ कसा उभारला जाणार, महालक्ष्मी फर्मच्या भागीदारांना पर्यायी जागा, आर्थिक नुकसान भरपाई मिळणार का? असे सारे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या प्रश्नाचा चेंडू आता राज्य शासन, नगर विकास विभागाकडे गेलेला आहे. दुसरीकडे कोल्हापुरात चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, चित्रकर्मी यांचे स्टुडिओ जतन करण्याच्या मागणीच्या बेमुदत आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. याचवेळी कोल्हापूर उत्तर विधानसभा, कोल्हापूर महापालिका याच्या राजरंगाचे आणखी एक पोटकथानकाची जोड असल्याने त्याचे पदर कसे विस्तारत राहणार यावरही बरेच काही अवलंबून आहे.