जिल्ह्यात ७९ दुकानांवर छापे मारून कोणाकडेही अतिरिक्त डाळीचा साठा आढळून आला नसल्याचे पुरवठा शाखेने स्पष्ट केले. मात्र अन्न व औषध प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील काही दुकानावर गेल्या चार दिवसात छापे टाकून लाखी डाळीचे नमुने हस्तगत केले असले तरी किरकोळ कारवाई वगळता बघ्याचीच भूमिका स्वीकारली आहे.
देशभरात तूरडाळीचे दर गगनाला भिडले असताना बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी आयातीबरोबरच देशांतर्गत साठे बाजारात आणण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाने बुधवारी शहरातील ७९ दुकानांची झाडाझडती घेतली. यामध्ये डाळीची ठोक विक्री करणारे ५१ आणि खाद्यतेलाचे २८ व्यापारी यांचा समावेश होता. मात्र पुरवठा विभागाला याठिकाणी काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. साठा मर्यादेत असल्याचे सांगण्यात आले.
तथापि, जिल्ह्यातील कर्करोगाला आमंत्रण देणाऱ्या लाखी डाळीची विक्री काही ठिकाणी होत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारीनुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सांगली व मिरजेतील काही दुकानातून नमुने घेतले आहेत. गेल्या सप्ताहात लाखी डाळीचा साठा हस्तगत करण्यात आला. मात्र त्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली असली तरी या विभागाचे पथक दुकानात जाऊन मालाचे नमुने जप्त करीत आहे. या नमुन्याचा अहवाल आल्यानंतरच कारवाई करण्यात येणार असल्याचे या पथकाकडून सांगण्यात येत असले तरी कागदोपत्री मात्र या कारवायांची नोंदच करण्यात आलेली नाही.
केवळ दसरा, दिवाळी या मोठय़ा सणांच्या पाश्र्वभूमीवर ही पथकाची कारवाई करण्यात येत असून जाणीवपूर्वक व्यापारी वर्गाला कारवाईची भीती दाखवून गरव्यवहार करण्यासाठीच हे नमुने गोळा करण्याचे प्रकार होत असल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे. याबाबत अन्न व औषध विभागाने मात्र असे कोणतेही नमुने घेण्यात आले नसल्याचे सांगितले.

Story img Loader