कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांनी मला उद्देशून अतृप्त आत्मा अशी टीका केली यामध्ये आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही. नरेंद्र मोदी यांच्या इतकी पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा कधीच झाली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे केली.
पत्रकारांची संवाद साधताना ते म्हणाले, मी पंडित जवाहर नेहरूंना पाहिले आहे. इंदिरा गांधी यांच्यापासून नंतरच्या सर्वच पंतप्रधानांच्या संपर्कात आलो आहे. त्यांच्याशी भेटणे, बोलणे झाले आहे. त्यांची भाषणे ऐकली आहेत. परंतु अतृप्त आत्मा सारखे शब्द नरेंद्र मोदी वापरतात तेव्हा त्यात काही आश्चर्य नसते. कारण मोदी यांच्या इतकी पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा कोणीच केलेली नाही, अशी टीका त्यांनी केली.
दादा नव्हे मोदी
अतृप्त आत्मा असे विधान मोदींनी का केले अशी विचारणा मी त्यांना भेटल्यानंतर करेन, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. याकडे लक्ष वेधले असता शरद पवार म्हणाले , अजित पवार काय म्हणाले यापेक्षा पंतप्रधान काय म्हणाले या बोलण्याला अधिक महत्त्व आहे.
स्थिर सरकार देवू
इंडिया आघाडीचे सरकार देशात आले तर पाच वर्षात पाच पंतप्रधान होतील, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी सभांमधून चालवली आहे. याबाबत शरद पवार म्हणाले ,१९७७ मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आवाज उठला गेला. आणि काँग्रेस पराभूत झाली. तेव्हा विरोधकांचा नेता कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु सर्वांनी एकत्रित येऊन मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड केली होती. त्यामुळे आताही इंडिया आघाडीचे सरकार आले तर पंतप्रधान कोण होणार याची चिंता करण्याचे काहीच कारण नाही. आम्ही सर्वजण निवडणूक झाल्यानंतर एकत्र बसू. एकमताने पंतप्रधान पदाचा निर्णय घेऊ. पंतप्रधान पदाबद्दल वाद असणे आमच्या कोणाच्याही डोक्यात नाही; ते त्यांच्या डोक्यात आहे, असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा…काँग्रेसला मत देणे म्हणजे पाप; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
त्यांना भाजप जागा दाखवेल
लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजप कडून काही धोका होऊ शकतो का, असा प्रश्न उपस्थित केला असता शरद पवार म्हणाले, भाजपची राजकीय नीती पाहता ते मित्र पक्षांना मोठे होऊ देत नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अपेक्षित निकाल लागला नाही तर भाजप त्यांना जागा दाखवून देईल.
कांदा उत्पादकांवर अन्याय
गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यात करण्यास परवानगी आणि महाराष्ट्राचा लाल कांदा निर्यात बंदी मध्ये अडकलेला अशा केंद्राच्या धोरणावर भूमिका स्पष्ट करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री असलेले शरद पवार म्हणाले, कांदा उत्पादक शेतकरी हा जिरायत शेत उत्पादक आहे. कांदा पिकातूनच मिळणाऱ्या पैशावर त्याची गुजराण होत असल्याने त्याच्या बाबतीत नेहमी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. मी केंद्रात मंत्री असताना कांदा दरवाढ झाल्याने या प्रश्नावर आंदोलन झाल्यावर विरोधी खासदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातलेल्या होत्या. मला त्यांनी कांदा निर्यात धोरणाची भूमिका विचारली. तेव्हा मी कांद्याची निर्यात झालीच पाहिजे. या भूमिकेच्या भूमिकेसोबत ठामपणे होतो. त्यातून कांदा उत्पादकांना दोन पैसे मिळत असतील तर तीच भूमिका घेतली पाहिजे. त्यांना कफल्लक करून सोडण्यात अर्थ नाही. मात्र आज ही भूमिका केंद्र सरकारकडे दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा…ठाकरेसेनेच्या कोल्हापूर जिल्हा उपप्रमुखपदी महेश बोहरा; महादेव गौड पदमुक्त केल्याची पक्षाची घोषणा
मोदी अज्ञानातून बोलले
आमचे सरकार आल्यापासून उसाच्या एफआरपी मध्ये प्रतिटन तीनशे रुपये दरवाढ केली आहे, असा दावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे एक मंत्री केंद्रात कृषी मंत्री असतानाही तितकी वाढ कधीच झाली नव्हती, अशी टीका शरद पवार यांना उद्देशून केले होती. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, मुळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दराची हमी देण्यासाठी आमच्या सरकारच्या काळात एफ आर पी दरवाढीचे सुत्र ठरवले गेले होते. त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचे काम झाले आहे. आता जे काही मोदी बोलतात त्यातून त्यांचे अज्ञान दिसते, अशी टीका पवार यांनी केली.
ती त्यांची भूमिका
भाजप सोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीमध्ये आधीच ठरला होता, अशी विधाने सातत्याने अजित पवार गटाकडून केली जात आहेत. या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, आमच्यातील काहींचा आग्रह होता की आपण त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करावी. त्या भूमिकेतून अशी विधाने होत असावीत.
हेही वाचा…ठाकरे सेनेचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख महादेव गौड यांचा पक्षाला रामराम; शिंदे सेनेत प्रवेश करणार
सांगलीत बदल नाहीच
यावेळी पत्रकार परिषदेस पत्रकारांशी बोलत असताना पश्चिम महाराष्ट्रातील काही मुद्द्यांवरील पवार यांनी भाष्य केले. सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा एकदा निर्णय ठरलेला आहे. ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे, असे म्हणत त्यांनी आता बदल शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
शिंदेवरील कारवाई म्हणजे सत्तेचा गैरवापर
सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करत असल्याचे देशभर दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री, हरियाणा मधील मंत्री याप्रमाणेच साताऱ्यात कारवाई होताना दिसत आहे. वास्तविक एकनाथ शिंदे हे कृषी बाजार समितीमध्ये कामगार प्रतिनिधी या नात्याने संचालक आहेत. निवडून आलेल्या सत्ताधाऱ्या प्रमाणे त्यांचे संचालक पद नाही. तरीही काही त्रुटी काढून गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांच्या विरोधात वातावरण करण्याचे काम सुरू असले तरी जनता मात्र शिंदे यांच्यासोबत आहे.
हेही वाचा…कोल्हापूर : पराभवाच्या भीतीने मोदींचे काँग्रेसवर बेछूट आरोप; रमेश चेनिथला
गादीचे विधान त्या अर्थाने
सातारा येथे भाषणावेळी गादीसोबत नव्हे तर कष्टकरी नेत्यांसोबत गेले पाहिजे असे विधान शरद पवार यांनी केले होते. कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून हे विधान कसे आहे, अशी विचारणा असे केली असता पवार यांनी, साताऱ्यामध्ये आपण केलेले विधान हे मतदारांनी मोदी सोबत जायचे नाही, या अर्थाने उद्देशून केलेले होते असा खुलासा केला.