दयानंद लिपारे
कर्करोग रुग्णांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी उपक्रम
कर्करोग रुग्णांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारी ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहीम आता कोल्हापूरमध्ये सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात दोनशेहून अधिक युवकांचा यामध्ये सहभाग असणार आहे. यामध्ये सहभागी युवक दाढीचे केस महिन्यासाठी वाढवतात.
ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात १९९९ मध्ये काही तरुणांनी एकत्र येऊ न ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ ही मोहीम सर्वप्रथम सुरू केली होती. या मोहिमेला जगभरातून अनेक युवकांनी प्रतिसाद दिला आहे. याचेच अनुकरण करवीरनगरीतील काही तरुणांनी सुरू करायचे ठरवले आहे. ही मोहीम शिरोळ तालुक्यातील कर्करोग रुग्णांना मदत करावी या उद्देशाने सुरू केली आहे. तुषार नेजदार, शहा या मित्रांनी ही मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेबाबत दर्शन शहा आणि तुषार नेजदार यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा विचार त्याच्या मित्रमंडळींना बोलून दाखवला. कोल्हापूर जिल्ह्यतील शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे हजारो रुग्ण आहेत.
त्यांच्या वेदना तर वाटून घेता येत नसल्या तरी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करता येऊ शकते. हा विचार घेऊन ही मोहीम कोल्हापूर जिल्ह्यत राबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी समाज माध्यमाचा आधार घेत एक गट बनवला. त्याद्वारे सध्या दोनशेहून अधिक युवक यामध्ये सहभागी झाले आहेत.
याअंतर्गत महिनाभर दाढी केली जात नाही. त्यासाठी येणारा खर्च वाचवून त्याची रक्कम जमा करून कर्करोग रुग्णांना उपचारासाठी द्यायची या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली असल्याचे तुषार नेजदार यांनी मंगळवारी सांगितले. जमा होणारी रक्कम १ डिसेंबर रोजी संबंधित रुग्णांना देण्यात येणार आहे.