जलसमृध्द असणाऱ्या कोल्हापूर जिल्हय़ाला पाणीबाणीचा दणका बसू लागला असून शहर व ग्रामीण भागात हाणामारीच्या घटना घडू लागल्याने जिल्हय़ात संघर्षांची गुढी उभारताना दिसत आहे. कर्नाटक शासनाने कृष्णा नदीतून अधिक प्रमाणात पाणी मिळण्याची मागणी केल्याने कृष्णेवर अवलंबून असणाऱ्या जिल्हय़ातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले असून ते या मागणीच्या विरोधात उभे ठाकले आहे. करवीर नगरीत एक दिवसाआड पाणीपुरवठय़ाला सुरुवात होताक्षणी पाणी मिळवण्यासाठी तलवार हल्ल्याच्या घटना दिसत आहेत. इचलकरंजीला पाणी हवे म्हणून नदीच्या पात्रातील बंधारे अधिक घट्ट केले असल्याने या पाण्यावर गुजराण करणाऱ्या नदी खालच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे  तर पाणी टंचाईमुळे जिल्हाभर आंदोलनाचे सत्र सुरू झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
कोल्हापूर जिल्हय़ाला आजवर कधीही दुष्काळझळा जाणवल्या नाहीत. राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधल्याने पिण्याचे पाणी, शेती, उद्योग अशा सर्वच गरजा भागविल्या गेल्या. काळम्मावाडी धरणामुळे पाण्याची बारमाही चन करता आली. गेल्या महिनाभरापासून मात्र पाणी टंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. त्यावर उपाययोजना म्हणून पाण्याची काटकसर करण्याचे नियोजन शासकीय पातळीवर केले जात आहे.
एप्रिल महिना उजाडला तोच एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याच्या नियोजनाने. कोल्हापूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन सुरू होताच भागाभागांत नागरिकांमध्ये संघर्ष उडू लागला. ऐतिहासिक िबदू चौकात तर टँकरचे पाणी मिळविण्यासाठी नंग्या तलवारी फिरल्या. काही भागाला एक-दोन तास तर काही भागाला आठ-दहा तास असा विरोधाभास करणारा पाणीपुरवठा हा प्रशासन आणि नागरिक यांच्यातील वादाला कारण ठरत आहे.
कोल्हापूरनंतर मोठे शहर आहे ते इचलकरंजी. या  शहराची तहाण भागविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पंचगंगा नदीवरील बंधाऱ्याचे बरगे काढण्यासाठी आलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले. इतके करूनही तीन लाख लोकसंख्येच्या या औद्योगिक शहरात आठवडय़ातून दोनदा कसाबसा अन् तो ही अपुरा पाणी पुरवठा होत आहे . याच प्रश्नावरून नगरपालिका म्हणजे पाणी प्रश्नाच्या आंदोलनाचा केंद्रिबदू बनला असून येथे सातत्याने नागरिक, नगरसेवक व अधिकारी यांच्यात संघर्ष जुंपल्याचे दिसत आहे. अशीच काहीशी स्थिती जिल्हय़ाच्या ग्रामीण भागामध्ये दिसू लागली असून जवळपास सर्वच बारा तालुक्यांमध्ये पाणी प्रश्न पेटला असून त्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.
वेध भविष्यातील पाणीटंचाईचे
भविष्यातील पाणीटंचाईचे वेध आतापासूनच लागल्याचे दिसत आहे.  इचलकरंजीच्या नियोजित वारणा नळ पाणी योजनेला शिरोळ तालुक्यातील दानोळी-कोथळी भागातून विरोधाची ललकारी उमटत असून त्यासाठी बठकांतून विरोधाचा कार्यक्रम निश्चित होत आहे.