कोल्हापूर शहरात नुकतेच केलेले रस्ते एकाच पावसात धुवून गेले. ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची नाही काय, असे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना विचारले असता याबाबत थेट उत्तर न देता चंद्रकांत दादांशी आमचे सूर जुळले आहेत, अशी टिपणी करुन त्यांचेकडील सहकार खाते गेल्याचे अप्रत्यक्ष समाधान आमदार मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन योजनेबाबत माहिती दिल्यानंतर अनौपचारिक बोलताना शहरातील उखडलेले रस्ते व महानगरपालिकेतील कारभार अधिकाऱ्यांचा मुजोरपणा याबाबत मुश्रीफ यांना विचारले असता महापालिकेतील सध्याची स्थिती व शहरातील गंभीर प्रश्न याची त्यांनी कबुली देतानाच महापालिकेच्या कारभारात आपण लवकरच लक्ष देणार असल्याचे सांगितले. शहरातील रस्त्याबाबत माध्यमांनीच जनतेचे लक्ष वेधावे अशी टिप्पणी करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नेहमी टीका करणाऱ्या मुश्रीफांनी बाजू काढत चंद्रकांत दादांशी आपले सूर जुळले आहेत असे वक्तव्य केले. त्यांच्याकडे सहकार खाते असताना होणारा त्रास आता कमी झाल्याने कटूता कमी करण्याचा दृष्टिकोन यातून दिसून आला. महापालिकेतील काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना आपले दुर्लक्ष झाल्याची कबुली देऊन काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटिल यांच्या व्यस्ततेमुळे हे झाले असले तरी आता दोघेही शहराच्या प्रश्नाकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. शहराची हद्दवाढ केंद्र शासनाच्या लोकसंख्येच्या निकषावर निधी मिळण्याबरोबरच इतर सर्व बाबतीत विकास होण्यासाठी आवश्यक असून दोन्ही बाजूंना होणार विरोध हा नाजूक प्रश्न आहे. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून मेरीटवर व आवश्यक गावांचा समावेश करुन निर्णय घ्यावा असे सुचवले आहे, असे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.