हजारो भाविकांचे कृष्णा स्नान

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे शुक्रवारपासून मंगलमय वातावरणात कन्यागत महापर्वास सुरुवात झाली. पहिल्या पर्वणीत उत्साहाने भाविक सहभागी झाले. कृष्णा नदीच्या तीरावर मध्यरात्रीपासून रंगलेल्या साधू, भाविक यांची गर्दी होती. ‘दिगंबरा.. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त’ या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रींचे शुक्लतीर्थ घाटावर सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी गंगा कृष्णा स्नान झाले. यानंतर शिरोळ येथील जयभवानी तोफेची सलामी देण्यात आली. भाविकांनी कृष्णातीरावरील घाटांवर स्नानाचा आनंद घेऊन पहिली पर्वणी उत्साहाने साजरी केली.

भाविकांनी श्रींच्या स्नानाच्या या अलौकिक सोहळय़ाची ‘याची देही याची डोळा’ अनुभूती घेतली. दत्त मंदिरातून गुरूवारी दुपारी निघालेली श्रींची पालखी  शुक्लतीर्थी नेण्यात आली. पालखी भाविकांच्या आणि दत्तभक्तांच्या उत्साहात रात्री उशिरा शुक्लतीर्थावर आली. शुक्लतीर्थावरील औदुंबराच्या झाडाजवळ श्रींची पालखी भाविकांच्या दर्शनासाठी विराजमान झाली. शुक्लतीर्थ घाटावरील पहाटेचे प्रसन्न वातावरण आणि पुष्पमाळांनी सजवलेल्या भव्य स्वागत कमानींच्या पाश्र्वभूमीवर औदुंबराच्या वृक्षाभोवती श्रींच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी लाखो भाविकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. या परिसरात श्रींच्या स्नानाचा सोहळा दत्तभक्तांना पाहता यावा, यासाठी प्रशासनाने आणि देवस्थान समितीने व्यवस्था केली होती.

शुक्लतीर्थावर श्रींच्या स्नान सोहळय़ानंतर भाविकांनी स्नानास प्रारंभ केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही या वेळी स्नानाचा लाभ घेतला. या वेळी मंदिर परिसरातील घाटावर भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. स्नान सोहळय़ाने कृष्णाघाट फुलून गेला होता. दत्त देवस्थान परिसरात हेलिकॉप्टरमधून या वेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. भाविकांनी कृष्णातीरावरील घाटांवर  स्नानाचा आनंद घेऊन पहिली पर्वणी उत्साहाने साजरी केली. दर १२ वर्षांनी येणाऱ्या कन्यागत महापर्वकाल सोहळय़ास शुक्लतीर्थावरील श्रींच्या स्नान सोहळय़ाने आरंभ झाला. आता पुढे वर्षभर हा सोहळा कृष्णातीरावर सातत्याने सुरूच राहणार आहे.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीसह शिरोळ येथे भोजनपात्र मंदिर, औरवाड येथे अमरेश्वर मंदिर, गणेशवाडी येथे स्वयंभू गणेश मंदिर आणि खिद्रापूर येथे पुरातन कोपेश्वर मंदिर यासह कृष्णातीरावरील अमरापूर, औरवाड, आलास, गौरवाड, बुबनाळ, गणेशवाडी, कवठेगुलंद आदी गावांतही कन्यागत महापर्वकालामध्ये भाविकांना स्नानाची पर्वणी लाभणार आहे.

 

Story img Loader