कोल्हापूर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण म्हणून पाळल्या जाणाऱ्या ‘बलिदान मासा’ला यंदा विलक्षण प्रतिसाद मिळाला आहे. यासाठी कार्यरत असलेल्या संघटनांच्या मते यंदा यात सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत २५ ते ४० टक्के इतकी वाढ झाली आहे. एकाच वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे हे पहिलेच वर्ष असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीसाठी बलिदान मास ही प्रथा महाराष्ट्रभर पाळली जाते. हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेले बलिदान नव्या पिढीला समजावे, ते व्यर्थ जाऊ नये यासाठी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, तसेच हिंदुत्ववादी संघटना, कार्यकर्त्यांकडून दर वर्षी धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. छत्रपती संभाजीराजे यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल व्यक्त केलेला सामूहिक दुखवटा म्हणूनही याकडे पाहिले जाते.

या वर्षी बलिदान मास २८ फेब्रुवारीला सुरू झाला असून, शनिवारपर्यंत पाळला गेला. या महिन्यात शंभूप्रेमी टक्कल करणे, व्यसनाचा त्याग, उन्हाचा कडाका असतानाही अनवाणी वावरणे, आवडत्या वस्तूंचा त्याग करीत असतात. औरंगजेबाने संभाजीराजांना यातना दिल्या, त्याचे स्मरण ठेवण्यासाठी ही कृती केली जाते.

वादाचे प्रसंग

या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा अनेक मंडळांना पुरवण्यात आली आहे. त्यासमोर जमून किशोर- किशोरी, तरुण-तरुणी संभाजी महाराजांचे स्मरण करीत असतात.

पश्चिम महाराष्ट्रातील काही शाळांमध्ये मुले अनवाणी गेल्यावर त्यांना शिक्षकांकडून रागावण्याचा प्रकार घडला. अशा शिक्षकांविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत. असे काही वादाचे प्रसंग उद्भवले आहेत.

प्रतिसादाची कारणे

बलिदान मास पाळण्यासाठी यंदा लक्षणीय प्रतिसाद का वाढला याची चर्चा होत आहे. त्याची काही कारणेही पुढे येत आहेत. यावर्षी लोकसभा, विधानसभा निवडणूक होऊन भाजपशी संबंधित हिंदुत्ववादी सरकार आले आहे. पूर्वी काँग्रेस विचारांचे सरकार असले, की हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या उपक्रमांवर बंधने येत असत. आता त्याचे फारसे भय राहिलेले नाही. यंदा संभाजी राजांचे चरित्र साकारणारा छावा हा चित्रपट तुफान चालला. त्याचाही किशोर, तरुण पिढीवर प्रभाव राहिल्याने प्रतिसाद वाढल्याचे सांगण्यात येते.

बलिदान मास पाळणाऱ्यांच्या संख्येत गेल्या दशकभरात वाढ झाली आहे. या वर्षी यामध्ये गावोगावी २५ ते ४० टक्के इतकी वाढ झाल्याचे संयोजकांच्या लक्षात आले आहे. सर्वच भागांमध्ये वाढता प्रतिसाद दिसत आहे. मी राहत असलेल्या शिरोळ गावात गतवर्षी ४० ठिकाणी बलिदान मास पाळला होता. या वर्षी ती संख्या ५५ पर्यंत पोहोचली आहे. -रावसाहेब देसाई, अध्यक्ष, शिव प्रतिष्ठान