कोल्हापूर : इचलकरंजीत नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करत आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय परिसरात ८८ कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुश्रीफ म्हणाले, की राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण देण्यासह रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा, सुविधा देणे हेच वैद्यकीय शिक्षणमंत्री म्हणून ध्येय आहे. तसेच, सध्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून ते रोखण्यासाठी जिल्ह्यातील ९ ते २६ वयोगटातील सर्व मुलींना गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक (एचपीव्ही) लस देण्यासाठीचा संकल्प केला आहे. सीएसआर निधी व लोकसहभागातून ही लस उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाहीही या वेळी मुश्रीफ यांनी दिली.

आयुर्वेदिक, होमिओपॅथी व निसर्गोपचार शासकीय रुग्णालय व महाविद्यालयांची कामेही गतीने मार्गी लावणार आहोत. १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली असल्याने एमबीबीएस शाखेकडील विद्यार्थी क्षमता वाढली आहे, असे मुश्रीफ म्हणाले. सीपीआर रुग्णालयातील सर्व इमारतींच्या नूतनीकरणाची कामे या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी दिली. वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी विविध विकासकामांची माहिती दिली. आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी मानले.