महापालिका आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत महापालिका प्रशासनाचा कारभार म्हणजे दिव्याखाली अंधार आहे. राजकीय पक्ष, उमेदवार यांना आचारसंहितेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करायला भाग पाडणारे महापालिका प्रशासन खुद्द महापालिकेतील पदाधिकारी यांच्या नावाचे फलक झाकण्याऐवजी तसेच ठेवले आहेत. महापालिकेच्या या कारभाराविरुध्द सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला असून या प्रकारास जबाबदार असणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून महापालिका प्रशासनाने सावळा गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. प्रथम प्रभागाचे आरक्षण करताना निवडणूक आयोगाचे नियम डावलण्यात आले. आयोगाने हरकत घेतल्यानंतर त्यामध्ये महापालिका प्रशासनाला दुरुस्ती करणे भाग पडले. प्रभाग आरक्षण रचनेमध्येही प्रशासनाच्या अनागोंदीचे दर्शन घडले. तर मतदार यादी निश्चित करताना प्रशासनाने हलगर्जीपणाचा छोटासा नमुना दाखवला. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात तक्रारींचा पाऊस पडला. सर्वच राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार यांनी आयुक्त पी.शिवशंकर यांच्यासह अधिकाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. प्रशासनाने आपली चूक कबुल करण्याऐवजी निवडणूक आयोगाने पुरविलेल्या सॉफ्टवेअरमुळे चूक झाल्याचे स्पष्टीकरण केले.
आता प्रत्यक्ष निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. तो शिगेला पोहोचला आहे. अशावेळी महापालिका प्रशासन आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी दक्ष झाला असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. प्रशासन दक्ष आहे याची माहितीही वारंवार दिली जात आहे. असे असले तरी खुद्द महापालिकेमध्ये आचारसंहितेचा भंग होत असल्याचे नमुने पहायला मिळत आहेत. आचारसंहितेचा अंमल सुरू झाल्यावर महापौरांसह पदाधिकाऱ्यांची वाहने प्रशासनाने ताब्यात घेतली. पण हेच प्रशासन महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नावाचे फलक काढण्यास विसरले आहेत. पालिकेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांना राजकीय पक्षाच्या नावाच्या उल्लेखासह पदाधिकाऱ्यांचे फलक पाहून आश्चर्यचकित व्हावे लागत आहे. उमेदवारांना नियमाबरहुकूम राबवणारे प्रशासन स्वतच्याच चुका मात्र प्रशासक हा सारा प्रकार महापालिकेतील कार्यक्षमता चव्हाटय़ावर आणणारा ठरला आहे. त्यामुळे या हलगर्जीपणास कारणीभूत असणाऱ्या आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त पी.शिवशंकर यांची असताना ते त्यांच्याच महापालिकेत आचारसंहितेचा भंग करीत आहेत हे या घटनेतून उघड झाले आहे. त्यामुळे त्यांना जबाबदार धरून निवडणूक विभागाने कारवाई करावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Story img Loader