कोल्हापूर: विरोधात बातमी आली म्हणून मी कधी कोणत्याही पत्रकाराला फोन करत नाही. अशा वस्तुनिष्ठ बातमीदारीमुळे त्या घटनेची दुसरी बाजू आम्हाला समजते. घटनेवर प्रकाशझोत टाकल्याने सरकारने प्रश्न सोडवला याचे समाधान पत्रकाराला मिळते. सरकारनेही धडाधड निर्णय घेतले पाहिजेत, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते पत्रकार संतोष पाटील, छायाचित्रकार डी. बी. चेचर, पत्रकार विजय के, वृत्त व्हिडिओग्राफर निलेश शेवाळे यांना सन्मान चिन्ह देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी सन्मानित केले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, सत्ता राबवत असताना आमच्याकडूनही काही चुका होतात. पत्रकारांकडून ती पकडले जाते. त्यातून आम्ही सुधारणा करतो. हे एक राज्यकर्ते आणि पत्रकार यांचे एक नाते बनले आहे.
हेही वाचा – शिवसेनेचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात असल्याने महिला सुरक्षित – डॉ. नीलम गोऱ्हे
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांचा सन्मान निधी, म्हाडा घरकुल योजना याबाबतच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांनी स्वागत केले. अध्यक्ष शितल दरवडे यांनी प्रास्ताविकात पत्रकारांचे प्रश्न मांडले. अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी यांनी पत्रकारांच्या अडचणी मांडल्या. कार्याध्यक्ष दिलीप भिसे यांनी आभार मानले. यावेळी समीर देशपांडे, प्रशांत साळुंखे, अमित हुक्किरेकर यांचा सत्कार करण्यात आला.