महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये पितृपक्षाचा अडथळा निर्माण झाला आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुस-या दिवशी प्रकाश नाईकनवरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर नाईकनवरे यांनी विनापरवाना प्रचार कार्यालय सुरू केल्याने त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे.
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. उमेदवारांना ना हरकत दाखले देण्यासाठी प्रत्येक महापालिका निवडणूक कार्यालयात एक खिडकी योजना सुरू केली असून येथे इच्छुकांची झुंबड उडाली आहे. एरव्ही निवडणूक प्रक्रियेवरून टीकेचे धनी बनलेले प्रशासन या कामी एकाच छताखाली सर्व प्रमाणपत्र, काही दाखले जागेवरच देत असल्याने त्याविषयी समाधानाचे बोल ऐकू येत आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यामध्ये पितृपक्षाने अडचण केल्याची चर्चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून होत होती. त्याचा प्रत्यक्ष अनुभव गेल्या दोन दिवसांत आला आहे. मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. तर बुधवारी दुस-याच दिवशी प्रकाश नाईकनवरे यांनी विभागीय कार्यालय क्रमांक १ येथे नामनिर्देशन पत्र दाखल केले. इतर अनेक इच्छुकांनी विभागीय कार्यालयांमध्ये येऊन अर्ज दाखल कसा करावा, याची माहिती देण्यासाठी गर्दी केली होती. पण अर्ज मात्र कोणीच दाखल केला नाही.
निवडणूक विभागाने आचारसंहिता भंग होण्याच्या प्रकारावर बारीक लक्ष दिले आहे. व्हीनस कॉर्नर प्रभागातून निवडणूक लढविणारे नाईकनवरे व त्यांच्या सून पूजा नाईकनवरे या दोघांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक विभागाच्या कर्मचा-यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. शाहुपुरीमध्ये विनापरवाना प्रचार कार्यालय सुरू केल्याची मुख्य तक्रार आहे.
इच्छुक उमेदवारांनी महापालिकेची विविध प्रकारची थकीत देयके भरण्यासाठी इच्छुकांनी महिनाभरापासून अगोदरच तयारी सुरू केली होती. ही बिले भरल्याने कोणत्याच विभागाची थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एक खिडकी योजना सुरू केली आहे. ताराराणी मार्केटमधील विभागीय कार्यालयात यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. अर्ज दाखल होताच पालिकेचे जे विभाग संगणकीय आहेत, त्या विभागाकडून ताबडतोब ना हरकत प्रमाणपत्र दिले जात आहे. भांडार, महाविद्यालय, गं्रथालय अशा ठिकाणचे ना हरकत दाखले दुस-या दिवशी दिले जात आहेत. प्रशासनाच्या या गतिमान प्रक्रियेचा अनेक उमेदवार लाभ घेत असून, उमेदवारांमधून समाधान व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा