दयानंद लिपारे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करवीरनिवासिनी महालक्ष्मीला वंदन करून सत्ताधारी भाजप-शिवसेना, मित्रपक्षांच्या युतीने प्रचाराची सुरुवात करून आपल्या ताकदीचे दर्शन कोल्हापुरात घडवले. याच वेळी आपापसांतील मतभेदांना पंचगंगेत तिलांजली देऊन विजयाची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार याच नगरीत झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्षांच्या बैठकीत करण्यात आला. जवळपास जुनेच प्रतिस्पर्धी उभे ठाकले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूर आणि त्याचबरोबरच हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात भगवा फडकवण्याचा संकल्प शिवसेना पक्षप्रमुखांनी केला आहे. त्याला मनोमन मदत करण्याचे भाजपने ठरवले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सेनेच्या जोडीला गुलाल लावण्यासाठी संपूर्ण मदत करण्याचा निर्धार रविवारच्या विराट सभेत बोलून दाखवला. कोल्हापूर जिल्ह्य़ात युतीच्या प्रचाराला एकसंधपणे सुरुवात झाली असताना महाआघाडीतील महागोंधळ कायम राहिला. काँग्रेस-मित्रपक्ष प्रचारात उतरले नसल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रविवारी वाट वाकडी करून जिल्हा काँग्रेस भवनात जाऊन एकोपा साधावा लागला. रुसवे-फुगवे, मतांतरे याच्या जुन्या कथा ऐकून झाल्यावर पाटील यांना ‘झाले गेले विसरून नव्याने कामाला लागू या’, अशी मनधरणी करावी लागली. काँग्रेसच्या नेत्यांनीही मग त्याला प्रतिसाद देण्याचे ठरवल्याने या मनोमीलनाने राष्ट्रवादीच्या गोटात दाटलेली काळजी दूर झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची मैत्री नैसर्गिक स्वरूपाची असल्याने त्यांच्यात अल्पकाळात ऐक्य साधणे कठीण जाणार नाही, पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भिन्न स्वरूपाच्या विचारांशी समरस होताना अडचणी येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या पातळीवरची कार्यकर्त्यांची मने किती गतीने सांधणार यावर बरेच काही अवलंबून आहे. साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील संघर्ष राजकीय-आर्थिक पातळीवरचा असल्याने त्यावरून तापवल्या जाणाऱ्या मुद्दय़ाला सामोरे जाण्याचे आव्हान कठीण असणार आहे.

लढतीची पुनरावृत्ती

* कोल्हापुरात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्याविरोधात शिवसेनेचे मागील वेळचेच उमेदवार संजय मंडलिक आणि राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात पुन्हा माने घराण्यातील उमेदवारी उभी ठाकली असून धाकटी पाती धैर्यशील माने असा सामना रंगणार आहे.

* महाडिक यांनी मंडलिक यांचा तर शेट्टी यांनी धैर्यशील यांच्या मातोश्री, राष्ट्रवादीच्या तत्कालीन खासदार निवेदिता माने यांचा पराभव केला होता. भाजप आणि काँग्रेसकडे जिल्ह्य़ातील एकही मतदारसंघ नसला तरी या पक्षांची मित्रपक्षांच्या उमेदवाराला कितपत ताकद मिळणार यावर निकालाचे होकायंत्र वळणार आहे.

* खेरीज, याला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे शिवसेना उमेदवारास पाठबळ आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारास भाजपचे आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांचे समर्थन अशा जबरदस्त उपकथानकाची जोड मिळाल्याने त्यातील पात्र कसे वळण घेणार यावरही विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालणार हे स्पष्ट होणार आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old player in kolhapur aakhada