येथील महालक्ष्मी मंदिराजवळील धोकादायक इमारतीची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली सापडल्याने वृद्ध महिला लतिका माधव कुलकर्णी (वय ७६, रा.
११९ बी वॉर्ड, महाव्दार चौक)यांचा मृत्यू झाला. तर संतोष माधव कुलकर्णी (वय ४९) आणि राजश्री संतोष कुलकर्णी (वय ४३ )हे दोघे जखमी झाले. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामुळे शहरातील धोकादायक इमारतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान या घटनेनंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी घटनास्थळी भेट दिली. शहरातील इतर धोकादायक इमारती दोन दिवसांत उतरून घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाद्वार रोडवरील महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिम दरवाजाशेजारी जयवंत कोडोलीकर यांच्या मालकीचे दुमजली घर आहे. या घराच्या खालच्या मजल्यावर स्टेशनरी दुकान आहे तर दुसऱ्या मजल्यावर मुक्त पत्रकार माधव कुलकर्णी हे आपल्या पत्नी लतिका, मुलगा संतोष आणि सून राजश्री यांच्यासह गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत. घरमालक कोडोलीकर यांच्यासोबत कुळ कायद्यावरून वाद आहे. त्यामुळे ही इमारत धोकादायक असूनही कुलकर्णी त्यामध्ये राहत होते. महानगरपालिकेकडून गेल्या पाच वर्षांपासून ही धोकादायक इमारत उतरून घेण्याबाबत कोडोलीकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र कोडोलीकर आणि कुलकर्णी यांच्यामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ही इमारत
उतरून घेण्यात आली नाही. आज सकाळी माधव कुलकर्णी हे घराबाहेर उभे होते तर त्यांची पत्नी, मुलगा आणि सून घरात होते. याच वेळी या इमारतीची स्वयंपाकघराशेजारील भिंत कोसळली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली माधव कुलकर्णी यांची पत्नी लतिका आणि मुलगा संतोष हे सापडले तर त्यांची सून राजश्री यातून थोडक्यात बचावल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या राजश्री यांनी आरडाओरडा केला. स्थानिकांनी या ठिकाणी धाव घेतली. मात्र दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. दरम्यान काहींनी अग्निशामक विभागाला या दुर्घटनेची माहिती दिली. अग्निशामक विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवत ढिगाऱ्याखालून लतिका आणि संतोष यांना बाहेर काढले. या दोघांसह जखमी राजश्री यांनाही तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र या ठिकाणी उपचारापूर्वीच लतिका यांचा मृत्यू झाला, तर संतोष यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. धोकादायक इमारतींना महानगरपालिकेकडून याआधीच नोटिसा बजावून त्या उतरून घेण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. बहुतांशी प्रकरणांमध्ये जागामालक आणि कुळ यांच्या मध्ये वाद असल्याने ही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे महानगरपालिकेलाही कारवाईत अडथळे येतात. मात्र येत्या दोन दिवसांत न्यायप्रविष्ट बाबी असणाऱ्या इमारतीसह इतर धोकादायक इमारतीही तातडीने उतरून घेणार असल्याची माहिती पी. शिवशंकर यांनी दिली आहे.
खोलखंडोबा परिसरात घराचा भाग कोसळला
दरम्यान खोलखंडोबा परिसरातील लक्ष्मण कृष्णा कुकडे यांच्या वडिलोपार्जति घराचा काही भाग आज सकाळी कोसळला. या घरात सध्या कोणीही वास्तव्यास नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र याची माहिती शेजाऱ्यांनी कुकडे कुटुंबीयांना देताच त्यांनी महानगरपालिकेशी संपर्क करून इमारत उतरून घेतली. कोणतीही दुर्घटना होण्याआधी कुकडे यांनी दाखवलेली समयसूचकता धोकादायक इमारतीच्या मालकांनीही दाखवण्याची गरज आहे.