कोल्हापूर : इचलकरंजीतील वस्त्रोद्योगात आधुनिकीकरण झाल्याने कापडाची गुणवत्ता सुधारली आहे. हे कापड ‘ ओम इचलकरंजी ‘ या नाममुद्रेमुळे जगभर पसरवण्याचा, या नावाने विक्री करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी केले.
इचलकरंजीतील कापड यापुढील काळात स्वतःच्या ब्रँडने जगाच्या बाजारपेठेत उतरवले जाणार आहे. ओम इचलकरंजी या नाममुद्रेच्या फलकाचे अनावरण मंत्री गिरिराज सिंह, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी विविध मागण्यांची मांडणी केली. प्रास्ताविक इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
मंत्री सावकारे म्हणाले, देशातील सगळ्यात चांगले वस्त्रोद्योग धोरण महाराष्ट्रात राबवले जात आहे. वीजदराचा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी आगामी काळात प्रति युनिट तीन रुपयांपेक्षाही कमी दरात वस्त्र उद्योगाला वीज देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यावेळी विविध संघटनांच्या वतीने मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना देण्यात आले.