‘मेक इन इंडिया’ ही भारताच्या विकासासंदर्भातील आजपर्यंतची सर्वाधिक सर्वसमावेशक संकल्पना आहे. भारताला बाजारपेठ समजून केवळ येथे येऊन आपला माल विकू नका, तर त्याची निर्मितीही येथेच करा. त्याचबरोबर ही निर्मिती केवळ भारतीय ग्राहक डोळ्यांसमोर ठेवून करू नका, तर त्या उत्पादनांच्या निर्मितीबरोबर निर्यातही करा, असे आवाहन करणारी ही अत्यंत प्रभावी अशी योजना आहे, असे मत या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
‘मेक इन इंडिया’ योजनेच्या अनुषंगाने परकीय कंपन्यांना येथे उत्पादनास परवानगी देत असतानाच देशी उद्योग आणि परकीय उद्योग यांचा समतोलही साधला जाणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ. स्वामी म्हणाले. शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर वुई केअर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेक इन इंडिया’ यावर आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद िशदे होते.
डॉ. स्वामी म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळात भारतात विकासाच्या तीन प्रमुख संकल्पना अस्तित्वात आल्या. त्यामध्ये पहिली आणि महात्मा गांधी यांच्या प्रभावामुळे तातडीने अस्तित्वात आलेली म्हणजे स्वदेशी. स्वयंपूर्ण ग्रामविकासाच्या संकल्पनेतून राष्ट्रविकास साधण्याचा हा प्रयत्न होता. त्यानंतर नियोजन आयोगाच्या स्थापनेनंतर अस्तित्वात आलेली दुसरी संकल्पना होती आत्मनिर्भरता. जे नाही- ते आयात करा आणि आहे ते- निर्यात करा, अशी सर्वसाधारण त्याची रचना होती. आणि तिसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे ‘मेक इन इंडिया’ होय.
डॉ. स्वामी म्हणाले, वॉलमार्टसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना अमेरिकन बँका दोन टक्के दराने वित्तपुरवठा करतात. अशा कंपन्या भारतात येऊन इथले मनुष्यबळ, पायाभूत सुविधा स्वस्तात वापरून आणखी गब्बर होतील. त्याचवेळी येथील स्थानिक उद्योगांचे कंबरडेही मोडतील. त्यामुळे स्थानिक उद्योगांना कोणतीही हानी पोहोचू न देता परकीय उद्योगांना परवानगी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे सांगून डॉ. स्वामी म्हणाले, सरासरी २६ वष्रे वयोगटातील जगातील सर्वाधिक तरुण आज भारतात आहेत. ही आपली क्षमता. केवळ मोठे भांडवल, प्रचंड मनुष्यबळ यांच्या बळावर कोणताही देश मोठी आíथक प्रगती साधू शकत नाही, तर ती प्रगती केवळ नवसंशोधनाच्या बळावरच साधता येऊ शकते. अशा नवसंशोधनासाठी सज्ज असणाऱ्या मनुष्यबळाची फौज उभी राहिली, तरच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो. तसे झाल्यास येत्या दहा वर्षांत आपण चीनलाही मागे टाकू शकतो.
यावेळी डॉ. स्वामी यांनी उपस्थितांच्या प्रश्नांनाही मनमोकळेपणाने उत्तरे दिली. ‘इसिस’च्या रुपाने दहशतवादाचे एक मोठे आव्हान आपल्यासमोर उभे असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. तर, त्याचवेळी प्रामाणिकपणे प्राप्तिकर भरणाऱ्या मध्यमवर्गावरील हा कर रद्द करावा, असे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे कौशल्य विकास समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर वुई केअर, कोल्हापूरचे मिलिंद धोंड यांनी आभार मानले. युवा जागर कौशल्य विकास केंद्राचे यशवंत शितोळे यांनी संयोजन केले.
‘मेक इन इंडिया’ आजवरची सर्वसमावेशक संकल्पना – डॉ. सुब्रमण्यम स्वामी
‘मेक इन इंडिया’ ही भारताच्या विकासासंदर्भातील आजपर्यंतची सर्वाधिक सर्वसमावेशक संकल्पना आहे. भारताला बाजारपेठ समजून केवळ येथे येऊन आपला माल विकू नका, तर त्याची निर्मितीही येथेच करा.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 26-01-2016 at 02:20 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omnibus conception of make in india dr subramanian swamy