ऊस तोडणीसाठी अतिरिक्त पैशांची मागणी करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा प्रकार सहसा ऊस मळ्यात पाहायला मिळतो. या अनिष्ट पद्धतीला छेद देत ऊस तोड मजुराच्या एका टोळीने अधिक मोबदला न घेता ऊस तोडणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे ऊस पट्ट्यात जोरदार स्वागत केले जात आहे.

ऊसतोड हंगाम सुरू झाल्यानंतर राज्यातील, परराज्यातील ऊस टोळ्या कोल्हापूर, सांगली भागात मोठ्या संख्येने येत असतात. ऊस तोड करणाऱ्या मजुरांची संख्या अपुरी असते. त्यामुळे ऊस तोड लवकर व्हावी, ती व्यवस्थित व्हावी यासाठी ऊसतोड मजूर, मुकादम यांना शेतकरी प्रतिट्रॉली एक हजार रुपये मोबदला  भोजन देणे भाग पडते . यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या विरोधात साखर आयुक्तालयाकडेही तक्रारी झाल्या आहेत.

हेही वाचा >>> इथेनॉल मिश्रणाच्या निर्णयात हस्तक्षेप करा, राजू शेट्टी यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

कष्ठाला त्यागाची जोड

दरम्यान, या पद्धतीला फाटा देण्याचा निर्णय एका ऊस तोड मजूर टोळीने घेतला आहे. करवीर तालुक्यातील म्हारूळ येथे ऊसतोड सुरू असतानायाचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. या टोळीतील विश्वास पाटील, बाजीराव चौगुले, राजाराम चौगुले, कृष्णात पाटील, ओमकार चौगुले, गजानन पाटील, बाजीराव चौगुले या तरुणांनी जादा  मोबदला घेणार नाही असा निर्धार करीत त्यागाचे दर्शन घडवले आहे.

लाखमोलाची मदत

शारीरिक कष्टाचे काम करण्याकडे तरुणाई पाठ फिरवत असताना या तरुणांनी हे कष्टप्रद काम आनंदाने  केले आहे. त्यांची कष्ठाळू वृत्ती आणि निरलस कर्तव्याची जोड मिळाल्याने त्यांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. त्यांची टोळी दरवर्षी एक हजार ऊसाची तोडणी करते. या माध्यमातून या टोळीने सुमारे लाखभर रुपये वाचवून शेतकऱ्यांना मोलाची मदत केली आहे.

Story img Loader