भुदरगड पठारावर मुसळधार पावसात मोबाइलवर बोलत असताना आकाशातून कडाडत येणारी वीज अंगावर कोसळून येथील प्रादेशिक परिवहन विभागातील मोटर वाहन निरीक्षक प्रकाश पंढरीनाथ पाटील (वय ५५, रा. हिम्मतबहाद्दुर परिसर, ताराबाई पार्क) यांचा गुरुवारी रात्री जागीच मृत्यू झाला. विजेच्या धक्क्याने पत्नी चंद्रकला (वय ४८) व मुलगी ऋतुजा (वय १९) काही अंतरावर फेकल्या गेल्याने त्या बचावल्या. या घटनेमुळे पत्नी व मुलीला जबर धक्का बसला आहे.
प्रकाश पाटील हे दोन वर्षांपासून येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील बाभूळगाव (ता. येवला) येथील रहिवासी होत. भुदरगड तालुक्यातील किल्ले पाहण्यासाठी पाटील पत्नी व मुलीसमवेत सकाळी भुदरगडला गेले होते. दुपारी गारगोटीमध्ये जेवण करून भुदरगड किल्ल्याकडे रवाना झाले. सायंकाळी पठारावर वावरत असताना मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मोटार झाडाजवळ पार्क करून तिघेही आडोशाला थांबले होते. काही काळाने त्यांना सहकारी मित्रांचा मोबाइल आल्याने ते त्याच्याशी बोलत होते. याचवेळी वीज त्यांच्या अंगावर कोसळली. क्षणार्धात पाटील जमिनीवर कोसळले.

Story img Loader