विकासकामांवरून लोकसभा उमेदवारांमध्ये जुंपली

देशातील सर्वोत्तम तीन खासदारांमध्ये निवड होऊनही राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या वाटयाला उपेक्षा आली आहे. पक्षातून कोडकौतुक होत नसल्याची खंत असताना दुसरीकडे विरोधकांनी त्यांच्या कामकाज पध्दती व यशाच्या मूल्यमापनावर टीका केली आहे. यातून महाडिक व त्यांचे लोकसभेचे प्रतिस्पर्धी संजय मंडलिक यांच्यातील वाक् युध्दाला तोंड फुटले आहे. महाडिक यांनी मतदारसंघाचे कोणतेही प्रश्न सोडविले नाहीत, या मंडलिक यांच्या टीकेला उत्तर देताना महाडिक यांनी त्यांना २५ वर्षांत एक तरी प्रश्न मांडला काय, असे  विचारताना मंडलिक पितापुत्रांवर निशाणा साधला आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकातील पराभवानंतर महाडिक यांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव करुन संसद गाठली. पहिल्या दोन वर्षांतच, नवोदित असतानाही महाडिक यांनी संसदीय कामकाजात आपला ठसा उमटवला. जिल्हा राज्य व देश पातळीवर विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करतानाच संसदीय कामकाजात सहभागी होत देशभरातील खासदारांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या कामगिरीची नोंद घेऊन खासदारांच्या संसदीय कामकाजाचे मूल्यमापन करणाऱ्या संस्थेने  महाडिक यांना देशातील सर्वात्तम तीन खासदारात निवड केली. त्यामुळे गेल्या महिनाभर सर्वच कार्यक्रमात महाडिक आपल्या या टॉप थ्री खासदारकीचे गुणगान गात असतात.

तथापि, महाडिकांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या या गुणवत्तेची फारशी कदर केली नाही. पक्षाच्या एका कार्यक्रमात महाडिक यांनी ही खंत बोलून दाखविली. महाडिक हे राष्ट्रवादीच्या मंचावर कमी आणि भाजपा नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत अधिक असतात असा कार्यकर्त्यांचा निष्कर्ष आहे. यामुळे त्यांचा सत्कार करण्यात पक्षीय पातळीवर फारसा कोणाला रस नसल्याचे दिसून येते. अखेर त्यांचा एक छोटेखानी सत्कार पक्षाकडून झाला इतकेच.

पक्षीय पातळीवर अशी उपेक्षा होत असताना शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी लोकसभेचे विरोधी उमेदवार महाडिक यांच्या कार्यशैलीवर टीकेची तोफ डागली आहे. संसदेत प्रश्न मांडणारे कितव्या क्रमांकावर या माहितीचे फलक शहरात झळकत आहेत. पण प्रश्न मांडले किती, यापेक्षा सुटले किती, विकासकामात जिल्हा कितव्या स्थानावर आहे, अशा शब्दात त्यांनी महाडिक यांच्या कामगिरीचे वाभाडे काढले. त्याला प्रतिउत्तर देताना महाडिक यांनी दोन वर्षांत ५३८ प्रश्न मांडण्याबरोबरच कोल्हापूरचे अनेक प्रश्न मार्गी लावले असल्याचे सांगितले.  तथापि, ज्यांच्या घरात ५ वेळा खासदारकी होती त्यांनी एकतरी प्रश्न मांडला का, मला मिळालेल्या सन्मानाने चिंतित होण्यापेक्षा तुमच्याकडे खासदारकी असताना जिल्हा कितव्या क्रमांकावर होता यांचे चिंतन करा, असा सल्ला दिला आहे. या वक्तव्यातून महाडिक यांनी दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक व पुत्र संजय मंडलिक या दोघांच्याही कामाचा जाहीरपणे पंचनामा केला आहे. आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हा वाद आणखी किती चिघळत राहणार याकडे लक्ष लागले आहे.

खासदाराची कामगिरी संदिग्ध

एका संस्थेने केलेल्या मूल्यमापनात खासदार धनंजय महाडिक पहिल्या तीन क्रमांकामध्ये असल्याचे गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आले होते. तथापि, आणखी एका संस्थेने अशाच प्रकारचे मूल्यमापन केले असून त्यातील आघाडीच्या कामगिरीत महाडिकांचा समावेश केलेला नाही. त्यामुळे या संस्था नेमक्या कोणत्या निकषावर मूल्यमापन करतात या विषयी संदिग्धता आहे.

 

 

Story img Loader