कोल्हापूर : महिला रुग्णाच्या उपचारातील हलगर्जीपणाबद्दल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची पुण्याचे आरोग्य उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यावर त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेवरील उपचारावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आबिटकर यांनी वरील स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका महिला रुग्णाला अधिकचे पैसे भरले नसल्याने उपचाराला उशीर झाला. मन सुन्न करणारी ही घटना पुण्यात घडली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयाचे आणि त्या कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतलं जाईल. अहवालानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
मंगेशकर रुग्णालयाची नोंदणी ट्रस्ट कायद्यांतर्गत आहे. यामध्ये शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ मिळत असतो. तरी देखील अशा प्रकारे पैशाची मागणी रुग्णालय करू शकते का, याची देखील चौकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. त्यानंतर जे चुकीचे असेल त्यावर राज्य सरकार कठोर कारवाई करेल, असेही आबिटकर यांनी सांगितले.