कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरा लगत असलेल्या शेतकरी संघाची इमारतीचा भूमिगत मजला, तळमजला व पहिला मजला ही जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने लागू केले आहेत. मात्र या निर्णयाला शेतकरी संघाने विरोध केला असून अशा मोगलाई पद्धतीने जागा ताब्यात घेता येणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शनिवारी नोंदवली आहे. यामुळे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मंदिरात नवरात्र ते नाताळ सुट्टी या कालावधीत भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. अशावेळी अनुचित घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने परिसर मोकळा असणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी सहकारी संघाची उपरोक्त जागा अधिग्रहित करण्याची नोटीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावर यांनी लागू केली आहे.
हेही वाचा >>>महाराष्ट्र जनता दलाला देवेगौडा यांची भूमिका, भाजपाशी युती अमान्य
तर न्यायालयात आव्हान
दरम्यान, उपरोक्त वास्तूला कुलूप लावून त्याच्या चाव्या तातडीने जिल्हा प्रशासनाकडे द्यावेत, असे आदेश आले असल्याचे शेतकरी संघाचे अशासकीय प्रशासकीय अधिकारी मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी सांगितले. शेतकरी संघाचे ४५ हजार सभासद असताना त्यांचा मालकी हक्क डावलून कोणतीही पूर्व सूचना न देता जागा अधिकृत करणे बेकायदेशीर आहे. मुळात या जागेबाबत शेतकरी संघ आणि भाडे तत्त्वावर दिलेल्या मॅग्नेट कंपनीचा उच्च न्यायालयात वाद सुरू असून न्यायालयाने या जागा, वास्तू बाबत जैसे थेचे आदेश दिले आहेत. तरीही प्रशासन अशा पद्धतीने जागा अधिग्रहित करणार असेल तर त्यास न्यायालयात आव्हान दिले जाईल, असेही देसाई यांनी सांगितले.
हेही वाचा >>>शेतकऱ्याने पंजा मारण्याआधीच शासनाकडून ऊस निर्यात बंदी अध्यादेश मागे – राजू शेट्टी
संघाचा गैरसमज
दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी संघाची हि जागा नवरात्र काळासाठी गर्दी नियंत्रण साठी घेतली जाणार आहे. यापूर्वीही शेतकरी संघाची हि विना वापर असलेली जागा पूर्वीही नवरात्र काळात नियंत्रण कक्षासाठी वापरली जात होती. शेतकरी संघ कायमचा ताब्यात घेण्याचा कोणताही विचार नाही, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.