ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे यांच्या खून प्रकरणी अटक केलेला समीर गायकवाड याला अंडा सेलमध्येच (अतिसुरक्षा विभाग) ठेवण्याचे आदेश मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दिले. समीरला दोन तासांहून  अधिक अंडा सेल बाहेर ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. पुढील सुनावणी ८ मार्च रोजी होणार असून या दिवशी समीरवर दोषारोप (चार्जफ्रेम) होण्याची शक्यता आहे.
समीरला अटक केल्यानंतर त्याला कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्याची मागणी समीरच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती. यानुसारच समीरला अंडा सेलमध्ये ठेवले होते. याचाच संदर्भ घेत बिले यांनी समीरच्या वकिलांना फटकारले. तुमच्याच मागणीवरून त्याला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. मग आता बाहेर काढण्याची मागणीही तुम्हीच करत आहात असा जाब विचारला गेला. तसेच समीरला कारागृहाच्या वतीने नियमित व्यायाम व नाश्ता यासाठी सेल बाहेर काढले जात असल्याचे सांगितले. यावर समीरचे वकील पटवर्धन यांनी समीरला अटक केल्यानंतर आणि आताची परिस्थिती वेगळी असल्याचे सांगितले. तर अॅड. विवेक घाटगे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी कारागृहास भेट असता समीरची काही तक्रार आहे काय, असे विचारले होते. यावर समीरने काहीच तक्रार नसून तो वाचत असलेल्या पुस्तकांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे अहवालात नमूद केले असल्याचा युक्तिवाद केला. दोनही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश बिले यांनी समीरला सकाळी ६ ते ९ या वेळेत सेल बाहेर सोडले जाईल, असा आदेश दिला.
पुन्हा उच्च न्यायालयाची पायरी
पानसरे हत्येचा तपास समीरभोवतीच थांबला आहे. तपास असमाधानकारक असून तो अर्धवट आहे मात्र यामध्ये काही  सकारात्मक गोष्टी आहेत. यामुळे पोलिसांना तपासासाठी आणखी थोडा वेळ द्यावा, दोषारोप निश्चित करू नये, अॅड. विवेक घाटगे यांनी केली. तर सरकारी वकील अॅड. चंद्रकांत बुधले यांनी गुन्ह्यातील हत्यार, मोटार जप्त करण्यात आले नसून १७३/८ खाली तपास अद्याप खुला असल्याचे सांगितले. यावर अॅड. पटवर्धन यांनी आक्षेप घेत समीर कारागृहात असल्याचे म्हणणे मांडले. यावर न्यायाधीश बिले यांनी पुढील सुनावणी ८ मार्च रोजी होणार असून या वेळी समीरवर दोषारोप निश्चित केले जातील, असे आदेश दिले. यावर अॅड. विवेक घाटगे यांनी पानसरे कुटुंबीय तपासावर असमाधानी तपास सखोल होण्यासाठी पोलिसांना अजून थोडा वेळ द्यावा. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा