|| दयानंद लिपारे
दत्त साखर कारखान्यात उत्पादित साखरेला दुप्पट दर मिळण्याची आशा
रासायनिक खतांमुळे होणाऱ्या परिणामांची चर्चा होत असताना आरोग्यदायी अशा सेंद्रिय साखर निर्मितीचा यशस्वी प्रयोग शिरोळ तालुक्यात करण्यात आला आहे. सेंद्रिय उसापासून ही सेंद्रिय साखर तयार करण्याचे काम दत्त सहकारी साखर कारखान्यात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे क्षारपड जमिनीचा प्रश्न गंभीर होत असताना त्यामधून पिकवलेल्या सेंद्रिय उसापासून ही साखर बनवली आहे. या साखरेला बाजारात दुप्पट किंमत मिळेल, असा व्यवस्थापनाला विश्वास आहे. पहिल्या टप्प्यात ६ हजार क्विंटल सेंद्रिय साखर तयार करण्यात आली असून पुढील हंगामात त्याचे प्रमाण दुप्पट होईल, असे कारखान्याचे अध्यक्ष, उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी गुरुवारी सांगितले.
जमिनीची सुपीकता फारच कमी झाली आहे. कृष्णा-पंचगंगा नदीकाठी हजारो एकर जमीन क्षारपड झाली असून त्यामध्ये कसलेही शेतीउत्पन्न घेणे अशक्य बनले आहे. दुसरीकडे शेतीमध्ये रासायनिक खत, कीटकनाशके यांचे प्रमाण अतोनात वाढले आहे. विषयुक्त शेती अशी त्यावर टीका होऊ लागली असून नैसर्गिक शेतीचे समर्थक त्याचे धोके सांगत आहेत. त्यामुळे दत्त साखर कारखान्याने सेंद्रिय उसाचे उत्पादन घेऊन त्याद्वारे सेंद्रिय साखर निर्माण करण्याचा प्रयोग हाती घेतला.
शेतकऱ्यांचे प्रबोधन करून त्यांचे सेंद्रिय उसाचे उत्पादन घेण्यासाठी मन वळवले. त्यासाठी सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते, कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी दत्त कारखान्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. शिरोळ तालुक्यातील शेती क्षारपडमुक्त व्हावी यायोगे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी यासाठी त्यांनी गावोगावी ‘गो’ परिक्रमा’ राबवली. क्षारपडमुक्त जमीन प्रकल्प राबवून सर्व जमीन सुपीक करण्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात केली.
गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रयत्नाचे गोड फळ म्हणजे दत्त साखर कारखान्यात सेंद्रिय उसापासून सेंद्रिय साखर बनवण्यात आली आहे. या सेंद्रिय साखरेला बाजारात दुप्पट भाव मिळणार आहे. अनेक ठिकाणाहून सेंद्रिय साखरेचा पुरवठा करावा अशी मागणी होत आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
बोलके आकडे
प्रारंभी पाच शेतकरी सेंद्रिय ऊस शेतीकडे वळले. त्यांनी २.४२ हेक्टर क्षेत्रातून ४११ मे. टन उसाचे उत्पादन घेतले. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना दाखवल्यावर ५०० शेतकरी पुढे आले. त्यातील २२७ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी सुमारे १०० हेक्टर मध्ये पिकवलेल्या ९७४४ टन सेंद्रिय उसाचे गाळप होऊन ६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, सुमारे ४५०० एकराहून अधिक क्षारपडमुक्त जमीन पिकाऊ होऊ लागली आहे.