कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या कचरा मैदानाला भीषण आग लागल्यानंतर तेथे भेट दिलेल्या महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्तांवर नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केला. या प्रकल्पाकडे महापालिकेकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी त्यांच्यासमोर संताप व्यक्त केला. या संतप्त नागरिकांनी आपल्या भावना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेत त्यांना सांगितल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाईन बाजार येथे कचरा संकलन मैदान आहे. येथे भीषण आग लागल्याने धुराचे लोट लाईन बाजार, कसबा बावडा परिसरात पसरून त्याचा नागरिकांना त्रास होत होता. आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधूनही बंब आले नव्हते, असा आरोप नागरिकांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी बोलताना केला. त्यांच्यासमोर महापालिकेच्या हलगर्जी कारभाराचा पाढा वाचण्यात आला. त्यानंतर आबिटकर यांनी महापालिकेच्या प्रशासक के. मंजू लक्ष्मी यांना कचरा संकलन प्रकल्प स्थळी भेट देण्याचे आदेश दिले. त्यानुसार के. मंजू लक्ष्मी घटनास्थळी गेल्या असता नागरिकांनी त्यांना घेराव घातला. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलक महिलांना बाजूला केले. संतप्त महिला व नागरिकांनी के. मंजू लक्ष्मी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. नागरिकांच्या आरोग्याला धोका असताना महापालिका प्रशासन निष्क्रिय राहिल्याबद्दल संताप व्यक्त केला. त्यानंतर प्रशासकांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून कडक शब्दांत सूचना केल्यावर सुस्त यंत्रणा कामाला लागली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Outrage from citizens affected by garbage fires in kolhapur zws