कोल्हापूर : ‘ग्लो ऑफ होप’ या प्रसिद्ध चित्रातील मॉडेल श्रीमती गीताताई कृष्णकांत उपळेकर (वय १०२) यांचे येथे निधन झाले. बुधवारी रात्री येथील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या मागे दोन मुली, मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
म्हैसूर येथील जगनमोहन पॅलेसमधील संग्रहालयात राजा रविवर्मा यांनी रेखाटलेली अनेक चित्रे आहेत. त्यांच्या चित्रांसोबत लावण्यात आलेले ‘ग्लो ऑफ होप’ हे हातात दिवा घेतलेल्या तरुणीचे सुंदर चित्र आहे. राजा रविवर्मा यांनीच हे रेखाटल्याचा अनेकांचा समज होता. मात्र, हे चित्र सावंतवाडी येथील चित्रकार एस. एल. हळदणकर यांनी काढले आहे.
हळदणकर यांची मुलगी गीता दिवाळीच्या दिवशी आईसाठी आणलेली साडी नेसून हळदणकर यांच्यासमोर आली. त्या वेळी ती १५ वर्षांची होती. त्यांनी गीताला मॉडेल म्हणून उभे करुन ‘ग्लो ऑफ होप’ हे चित्र रेखाटले. ‘इटालियन एन्सायक्लोपीडिया’मध्ये या चित्राचा उल्लेख जलरंगात त्या काळी जगभरात रेखाटलेल्या ३ सर्वोत्कृष्ट चित्रांमधील एक असा केला आहे.