कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्तपदी पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी त्यांनी महापालिकेत येऊन पदभार स्वीकारला. दरम्यान, ओमप्रकाश दिवटे यांची येथून बदली झाली असून ते ‘मॅट’मध्ये आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिकेची स्थापना दोन वर्षांपूर्वी जून महिन्यात झाली. सुधाकर देशमुख यांनी दोन वर्ष प्रशासक म्हणून काम पाहिले. त्यानंतर दिवटे हे गेले वर्षभर या पदावर कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा असताना मुदतपूर्व बदली झाली आहे.
या पदावर आता सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली आहे. पाटण गावच्या सुकन्या असलेल्या पाटील यांना १३ वर्षाचा प्रशासकीय अनुभव आहे. त्यांच्या सेवेची सुरुवात धुळे महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावरून झाली. सांगली महापालिका उपायुक्त येथे त्यांनी काम पाहिले. महाबळेश्वर शहराचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले होते.