स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी पंचगंगा घाट परिसरात नागरिक, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणवादी संस्था यांच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये पाच डंपर कचरा उठाव करण्यात आला. महापौर अश्विनी रामाणे, आयुक्त पी.शिवशंकर यांच्यासह नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवली.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा, पर्यटनस्थळे, तसेच पुरातत्त्व वास्तू या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत शासनाकडून निर्देश दिले आहेत. याअंतर्गत आज पंचगंगा नदी घाटावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेमध्ये पंचगंगा घाट नदीपात्रातील प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा गोळा करण्यात आला. घाटावरील पायऱ्यांची स्वच्छता करण्यात आली. पंचगंगा नदी घाटाच्या संपूर्ण परिसराची झाडलोट करून तणकट काढण्यात आले. यावेळी पंचगंगा नदीवर कपडे व जनावरे न धुण्याबाबत संबधित नागरिकांना सूचनाही देण्यात आल्या.
या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सकाळ माध्यम समूहाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणवादी संस्थांचे प्रतिनिधी असे जवळपास ५०० लोक सहभागी झाले होते. तसेच मोहिमेमध्ये ३ डंपर, १ जेसीबी अशी यंत्रणा कार्यरत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा