कॉम्रेड गोविद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी आणि सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या पोलीस कोठडीत शनिवारपर्यंत वाढ करण्यात आली. सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.
कोल्हापूर पोलीसांनी गेल्या बुधवारी सांगलीतून समीर गायकवाड याला अटक केली. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्याची मुदत आज संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. समीर पोलीस तपासात सहकार्य करीत नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. समीर आणि ज्योती कांबळे यांच्यातील मोबाईल संभाषणातून पानसरे हत्येचा उलगडा झाला. त्याचबरोबर समीर आणि त्याची बहीण अंजली यांच्यातील संभाषणातूनही पोलीसांना पुरावे मिळाले असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले. पोलीसांनी त्याच्या घरातून ३१ सीमकार्ड जप्त केली आहेत. याबद्दल आणखी चौकशी करायची आहे. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी वकिलांनी केली. न्यायालयाने ती मान्य करीत २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला.
कोल्हापूर बार असोसिएशनने समीर गायकवाडचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे सनातन संस्थेने इतर शहरांतील वकिलांची फौज बचाव पक्षासाठी उभी केली होती. त्यामुळे समीर गायकवाडसाठी वकील पत्र घेणाऱया वकिलांची गर्दीच न्यायालयात झाली होती.
सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेले गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे या उभयतांवर दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. पाच दिवसांच्या उपचारानंतर गंभीर जखमी झालेले पानसरे यांचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तेव्हापासून पोलीस पानसरे यांच्या खुन्याचा तपास करीत होते. त्यासाठी वेगवेगळी पथके तनात केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर व पानसरे यांच्या खुन्यांचा तपास घेण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याने टीकेची झोड उठली होती. याची दखल घेऊन राज्य सरकारने कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय कुमार यांची नियुक्ती केली होती.
तपासादरम्यान पोलिसांचा सांगलीतील समीर गायकवाड या तरुणावरील संशय बळावला होता. पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्या हालचाली, संपर्क यावर बारीक नजर ठेवली होती. माहितीची खात्री झाल्यानंतर मंगळवारी रात्री समीरच्या सांगलीतील घरावर छापा टाकला. गेल्या बुधवारी पहाटे चार वाजता त्याला अटक करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा