कोल्हापूर महापालिकेतील नव्या सभागृहातील सत्तासूत्रे घेणाऱ्या नगरसेवक आणि त्यांच्या नाठाळ प्रवृत्तीवर विडंबनात्मक फटकारे मारणारा कोल्हापुरी फटका हा चित्रकारितेचा उपक्रम मतदारांचे प्रबोधन करण्याबरोबरच नगरसेवकांनाही कामाची जबाबदारी करून देणारा ठरला. करवीरनगरीतील युवा रंगकर्मी विजय टिपुगडे यांनी साकारलेल्या या उपक्रमातून सोशल मीडियावर शंभर विडंबनात्मक पोस्टर प्रसारित केली. त्याला सर्वसामान्य कोल्हापूरकर युवकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला असून रविवारी होणाऱ्या मतदानावेळी तो उद्बोधक ठरण्याची चिन्हे आहेत.
महानगर पालिकेच्या निवडणुकीविषयी प्रबोधन करण्याच्या हेतूने मतदार जागृती अभियान वेगळ्या पद्धतीने पण ठोस विचाराने सुरू करण्याचे टिपुगडे यांनी ठरविले होते. हेतू हाच आहे, की महापालिका भ्रष्ट-अनागोंदी कामकाज पद्धतीत किमान थोडातरी बदल होईल. मावळत्या सभागृहाने जी बदनामी करवीरनगरीची झाली, ती सामाजिक कार्यामध्ये पुढे असणाऱ्या टिपुगडे यांच्यातील कलाकाराच्या दृष्टीने वेदनादायी होती. कोल्हापूर हे कलापूर म्हणून नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. पण त्याच कोल्हापूरची जनता मूलभूत सोईसुविधांपासून वंचित आहे आणि या विषयी जनता काहीही बोलू शकत नाही. जनतेची शक्ती, आवाज धनदांडग्या सेवकांचा कडून दाबला जातो हा पूर्वानुभव आहे. म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा नाही.
किमानपक्षी निवडणुकीनंतर येणाऱ्या नवीन सभागृहामध्ये किमान काही चांगले चेहरे यावेत ही प्रत्येक कोल्हापूरकराची अपेक्षा आहे. त्यासाठी मतदार जागृती हा प्राथमिक प्रयत्न असेल हे जाणून टिपुगडे यांनी सोशल मीडियावर काही विडंबनात्मक पोस्टर प्रसारित केली. त्याला सर्वसामान्य कोल्हापूरकर युवकांकडून भरघोस प्रतिसाद मिळला. काहींना हा वेडेपणा वाटला तर काहीना भलतेच धाडस. काहींनी निनावी धमक्याही दिल्या. पण सामान्य जागरूक कोल्हापूरकरांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या विडंबनात्मक कलाकृती प्रत्येक जण पुढे फॉरवर्ड करत होता. पण काही महाभाग याचा स्वतच्या प्रचारासाठी गर वापर करत असल्याचेही निदर्शनास आले असून त्यामुळे टिपुगडे नाराजी व्यक्त करताना दिसतात. खरे तर सोशल मीडियावरील या उपक्रमास इतका प्रतिसाद मिळेल असे त्यांना वाटले नव्हते. शनिवारी सुजाण-जागत्या नागरिकांच्या सहकार्यामुळे टिपुगडे यांच्या या अल्पशा प्रयत्नाचे शतक पूर्ण होत आहे. येथून पुढचा काळातही जेथे मला चुकीचे दिसते तिथे माझा हा कलात्मक कोल्हापुरी फटका बसेलच, अशी प्रतिक्रियाही त्यांनी नोंदविली.

Story img Loader