कोल्हापूर : ठाकरे सरकार सत्तेतून बाहेर पडले तेव्हा महायुतीच्या सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी पाठिंबा पत्र तयार केले होते. हे खोटे असेल तर मी राजकारणातून निवृत्त व्हायला तयार आहे पण याबाबत कोणी खोटे बोलत असेल तर त्यांनी निवृत्त व्हायची तयारी दाखवावी अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंबा मुद्द्यावर ज्येष्ठ नेते पवार यांचे नाव न घेता आव्हान दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील तपोवन मैदानात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मंत्री यांनी आयोजित केलेल्या उत्तरदायित्व सभेवेळी अजित पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याची कारणमीमांसा करतानाच या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांचा कडक शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, सत्तेत सहभागी झाल्यानंतरविकासाचे प्रश्न मार्गी लागतात. त्यासाठीच पक्षातील आमदारांचा दबाव होता. ही भूमिका लक्षात घेऊन महायुतीमध्ये सहभागी झालो. त्यामुळे साखर कारखान्यांच्या प्राप्तीकरापासून ते आमदारांच्या निधीचे प्रश्न मार्गी लागले आहेत. कोणताही स्वार्थ साधण्यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झालो नाही तर विकासाची कामे गतीने पुढे जावी यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचे सांगत अजित पवार यांनी टीकाकारांना फटकारले.
हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंचं सरकार पडत होतं त्याच वेळी…”, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ घेऊन अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही याबाबत निर्णय घेतला होता पण तो उच्च न्यायालयात टिकला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ता काळात घेतला निर्णय सत्ता काळात तो उच्च न्यायालयात निर्णय टिकला, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकला नाही .आता हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.मराठा समाजासह मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या जाती , अल्पसंख्यांक यांना सर्वांना योग्य आरक्षण योग्य आणि यथोचित आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच सर्व पक्षांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली असून याला सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जंगी स्वागत
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापुरात प्रथम आले असताना त्यांचे ताराराणी पुतळा येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी, जयघोषात स्वागत संयोजक हसन मुश्रीफ व सहकाऱ्यांनी केले.