टाळेबंदीमुळे दारू दुकानांना टाळे ठोकले गेल्याने कोंडी झालेल्या तळीरामांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील दारू दुकान समोर सोमवारी रांगा लावल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण झाले नसल्याने त्यांना तिष्ठत उभे रहावे लागले. सायंकाळी परवानगी मिळाल्यानंतर तळीरामांचा लांबचलांब रांगा लागल्या. यावेळी नंबर मिळवण्यावरून एका ठिकाणी त्यांच्यामध्ये हाणामारी झाल्याचे पहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाळेबंदीच्या कालावधीत दारू दुकान बंद राहिल्याने तळीरामांमध्ये चुळबुळ सुरु होती. मद्य मिळवण्यासाठी तिप्पट-चौपट किंमत मोजण्याची त्यांची तयारी होती. तरीही ते मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आज दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर तळीरामांना हायसे वाटले. याच उत्साहाच्या भरात सोमवारी सकाळपासून दारू मिळवण्यासाठी त्यांनी दुकानांसमोर रांगा लावल्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने या बाबतचा निर्णय घेतलेला नसल्याने दुकाने उघडली नव्हती. भर उन्हात तळीराम दुकान उघडण्याची वाट पाहत होते.

ग्राहकांमध्ये बेदम हाणामारी

दुपारनंतर जिल्हा प्रशासनाने काही अटींवर दुकान सुरू करण्यास परवानगी दिली. दुकाने उघडल्यानंतर तळीरामांचा लांबच लांब रांगा दुकानांसमोर लागल्या होत्या. त्यात नंबर मिळवण्यातून ग्राहकांमध्ये बेदम हाणामारी झाल्याचा प्रकार शनिवार पेठ भागात सुशील वाईन्स समोर घडला.

मद्यविक्री मर्यादित वेळेतच

जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकानं काही अटींवर सुरू राहतील, असे निर्देश उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. कंटेन्मेंट झोन वगळून शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकानं, कॉलनी दुकानं व निवासी संकुलातील दुकानं सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उघडी ठेवता येणार आहेत. मात्र, यावेळी पाच पेक्षा अधिक ग्राहक न ठेवता त्यांच्यामध्ये प्रत्येकी ६ फूटांच अंतर राखणे, तसेच दर दोन तासांनी परिसर निर्जंतुक करणं अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People of kolhapur struggling for liquor doing fight for numbering aau