कोल्हापूर : राज्यात दलित आणि अल्पसंख्याकांवर अन्याय वाढत आहेत. जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या १५ जागा मिळाव्यात अशी मागणीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली असल्याचे कवाडे यांनी सांगीतले. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार व प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आज कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी, शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा महायुती सरकारमध्ये सहभागी असल्याचे सांगून राज्यात लोकाभिमुख कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचा दावाही केला.
तर दुसरीकडे, राज्यात अल्पसंख्याक आणि दलितांवर सुरू असलेल्या अन्यायाकडे कवाडे यांनी लक्ष वेधले. कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे एका दलित कुटुंबाचे घर पाडण्यात आले. मिरज तालुक्यातील बेडग या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात आलेली स्वागत कमान पाडण्यात आली. त्यामुळे राज्यात दलित आणि अल्पसंख्याकांवर अन्याय सुरू असून समाजामध्ये जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : “महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत ऑफर नाही; पण लवकरच येईल”, शाहू महाराज यांचा निर्वाळा
सरकारी गायरान जमिनी मागासवर्गीय भूमीहिनांना वाटप कराव्या, अशीही आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरही भाष्य करताना त्यांनी राज्यातील लोकसभेच्या दोन जागा आणि विधानसभेच्या १५ जागा मिळाव्यात. त्याचबरोबर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील पीपल्स रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्याचे सांगितले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी, जिल्हा सरचिटणीस विद्याधर कांबळे, जिल्हा महिला अध्यक्ष लताताई नागावकर, माधुरी कांबळे, रेखाताई कांबळे, सोमनाथ घोडेगाव, सुरेश सावर्डेकर आदी उपस्थित होते.