भोपाळच्या संस्थेकडून दोन्ही विषयांवर फुल्या
राज्यातील पदविका अभियांत्रिकी अभ्याक्रमातून विज्ञान आणि इंग्रजी हे विषय वगळण्याचा घाट राज्य तंत्र शिक्षण मंडळाने घातला आहे. सन २०१७ पासून प्रस्तावित होणाऱ्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा आराखडा निर्माण करण्याचे काम राज्य तंत्र शिक्षण मंडळाने भोपाळ येथील राष्ट्रीय तांत्रिक शिक्षक प्रशिक्षण व संशोधन संस्थेकडे सोपवले असून या संस्थेने द्वितीय सत्राकरिता शास्त्र शाखेचे भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे दोन्ही सद्धांतिक विषय, त्यांचे प्रात्यक्षिक तसेच पहिल्या वर्षांच्या दुसरा सत्रातील इंग्रजी या विषयावरच फुली मारली आहे. यामुळे पदविका अभियांत्रिकी विषयांच्या कार्यभारामध्ये असमतोल निर्माण होण्याबरोबरच राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात हे विषय शिकवणाऱ्या सुमारे ४ हजार पदविका प्राध्यापकांना नोकरीवर कायमचे पाणी सोडावे लागणार आहे.
गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात लादण्याच्या हा प्रयत्न असल्याने प्राध्यापकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. अभियांत्रिकी शाखेचे सुरुवातच मुळी शास्त्र शाखेतून झाली. १९९६ साली अभियांत्रिकी पदविकेच्या प्रथम वर्षांकरिता पुनर्रचित अभ्यासक्रम बनवला तेव्हा गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे १०० गुणांचे सद्धांतिक विषय व ५० गुणाचे प्रात्यक्षिक वेगळे होते. २००७ पासून सत्र पद्धतीचा स्वीकार होऊन भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विषयांचे एकत्रीकरण करून त्यांचे वेगळे अस्तित्व पुसून टाकले. आता २०१७ पासून प्रस्तावित होणाऱ्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा आराखड्यामध्ये तर शास्त्र शाखेला आणि आंतरराष्ट्रीय संपर्क भाषा असलेल्या इंग्रजी विषयाला सुटी दिली जाणार आहे .
अभियांत्रिकी पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी अभियांत्रिकीसाठी थेट द्वितीय वर्षांला प्रवेश मिळतो. येथे भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे दोन्ही विषय प्रात्यक्षिकसह प्रथमवर्षांला शिकवले जातात. बदलत्या आराखड्यानुसार पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये शास्त्र शाखेचा समावेश न केल्याने विद्यार्थी शैक्षणिकदृष्टय़ा अप्रगत राहून कौशल्य विकासापासून वंचित राहून तो नवीन शैक्षणिक आव्हान पेलण्यास असमर्थ बनण्याचा आणि अभियांत्रिकी शिक्षणाच्या मूळ गाभ्यास धक्का लागण्याचा धोका असल्याचे प्राध्यापक सांगतात. त्याचबरोबर या शाखेचे सुमारे ४ हजार (त्यातील २ हजार कायम सेवेतील) अधिव्याख्याते अतिरिक्त ठरून त्यांचा समायोजनाचा गंभीर प्रश्न शासनासमोर निर्माण होणार आहे. त्यातील अनेकांच्या सेवेवर गंडांतर येऊन कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
नवीन आराखडा बनवण्याचे हे काम वरिष्ठ प्राध्यापकांकडून करवून घेण्याच्या प्रथेऐवजी भोपाळच्या आणि तेही प्रशिक्षणाचे काम करणाऱ्या संस्थेकडून करवून घेण्याच्या राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
आंदोलनाचा पवित्रा
मानसिक दडपणाखाली आलेल्या पदविका अभियांत्रिकीकडे शास्त्र विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी त्यांचे अस्तिव संपवणाऱ्या संभाव्य आराखडय़ास विरोध चालवला आहे. या प्राध्यापकांनी पदवीधर मतदार संघाचे आमदार तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेऊन कैफियत मांडली आहे. आजवर असंघटित असणारे हे प्राध्यापक आता अभाविपच्या पाठबळावर आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे प्रा. सुनील कराड यांनी सांगितले.